बिल्व परिसरात देवतांच्या द्वारे स्थापीत सिद्धलिंगांच्या दर्शनाने समाधान प्रत होते ;हरिहर केशव गोविंद बनात भाविकांची गर्दी

बिल्व परिसरात देवतांच्या द्वारे स्थापीत सिद्धलिंगांच्या दर्शनाने समाधान प्रत होते ;हरिहर केशव गोविंद बनात भाविकांची गर्दी

बिल्व परिसरात देवतांच्या द्वारे स्थापित सिद्धलिंगांच्या दर्शनाने समाधान प्राप्त होते 

 

श्रावण महिन्यातील चवथा सोमवार व अजा एकादशीच्या निमित्ताने बेलापूर खुर्द येथील हरिहर केशव गोविंद बनातून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी बेलापूर पंचक्रोशीतील अकरा सिद्धलिंगांच्या दर्शनाचा लाभ घेतला. स्कंदपुराणातील वर्णनाप्रमाणे त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी आकाशवाणीद्वारे सांगितल्याप्रमाणे श्री हरिविष्णू, ब्रम्हदेव व इंद्रासह सर्व देवता या ठिकाणी असलेल्या बिलवतीर्थाच्या काठी आप आपले स्वतंत्र्य शिवलिंग स्थापन करून शिवआराधना करू लागले. त्यांच्या कठोर तप साधनेला प्रसन्न होऊन शंकरांनी त्यांना आश्वस्त करून समयानुसार त्रिपुरासुराचा वध केला.

           ही सर्व शिवलिंग स्थापन करणाऱ्या देवतांच्या नावाबरोबर ईश्वराच्या नावाने म्हणजे ब्रम्हेश्वर, सूर्येश्वर, चंद्रेश्वर इत्यादी नावाने प्रसिद्ध झाली. बेलापूर बनापासून ते प्रवरासंगम कायगाव टोका इथपर्यंत अकरा सिद्धलिंग प्रसिद्ध आहेत. यातील काही दुर्लक्षित लिंगांपैकी दोन वर्षांपूर्वी बेलापूर बनातील उमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार प पू मोहन खानविलकर यांच्या पुढाकाराने झाला तर सध्या एकलहरे येथील सूर्य देव द्वारे स्थापित शिवलिंग मंदिराचे बांधकाम काही दानशूर नागरिकांच्या मदतीने सुरू आहे. यासाठी आणखी मोठ्या सहकार्याची आवश्यकता आहे. 

या सर्व शिवलिंगाची महती जाणून भाविकांनी गेल्या काही वर्षांपासून या शिवलिंगाची परिक्रमा करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी मोटार सायकल व चारचाकी वाहनांतून सुमारे सोळा पुरुष व नऊ महिला भगिनींनी या परिक्रमेत सहभाग घेतला. सोमवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता बेलापूर बनातील घाटावर अमृतवाहिनी प्रवरामाई ची आरती करण्यात आली , यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी सात वाजता सिद्धलिंगांची परिक्रमेला सुरुवात झाली. प्रथम उमेश्वर, मग उकलगावातील ब्रम्हेश्वर कालीकेश्वर करून एकलहरे येथील सूर्येश्वर येथे दर्शन घेऊन ही परिक्रमा बेलापूर येथे इंद्र्बिलवेश्वरच्या दर्शनाला पोहोचली. मग बेलापूर खुर्द येथील रामेश्वर मंदिर दर्शन झाल्यावर श्री किशोर भगत यांनी सर्व भाविकांना या परिक्रमेचे महत्त्व, प्रत्येक शिवलिंगाची स्थापना कशी व कुणी केली याची सविस्तर माहिती दिली. यावेळी बेलापूर खुर्द येथील अनेक ग्रामस्त उपस्थित होते. पुढे वायुदेवतेद्वारा स्थापित अम्लेश्वराचे दर्शन घेऊन चांदेगाव येथील चंद्रेश्वराचे व नंतर करजगावातील कुबेरेश्वराचे दर्शन झाले. यावेळी प्रगतीशील शेतकरी व युवा उद्योजक कैलास दत्तात्रय लावरे यांनी फराळ, केळी व चहा उपलब्ध करुन दिला. त्याचप्रमाणे नानाभाऊ कोतकर व इतर कोतकर परिवार यांनी सुद्धा आग्रहपूर्वक चहापाण्याची व्यवस्था केली. हरिहर केशव गोविंद बनात या परिक्रमेची सांगता झाली.

   या परिक्रमेतून एक अलौकिक समाधान प्राप्त झाले असे उदगार ज्येष्ठ महिला भाविक लताबाई सोमनाथ पुजारी यांनी व्यक्त केले तर या सगळ्या शिवलिंगाची महती जाणून घेता आली व त्यांचे दर्शन करता आले हे भाग्य आहे असा उल्लेख केसापूर येथील भाविक शिवाजी देवकर व अशोक मेहेत्रे यांनी केले. केशव गोविंद देवस्थानचे विश्वस्त विनय भगत, धनंजय हरदास, अनिल पुजारी, किशोर भगत, सोमनाथ वाकडे, दत्तात्रय पुजारी, मछीन्द्र बडधे , श्री व सौ विकास जोशी, दिलीप भगत, श्री व सौ मे राम पुजारी, अविनाश भगत , कालिंदी पुजारी, नंदाताई हरदास, मंगलताई पुजारी, मंदाबाई हरदास, जोशीताई , मंदाताई महाडिक, जोशी ताई , बेहळेताई, श्री व सौ जगताप इत्यादी भाविक या परिक्रमेत सहभागी झाले होते . सर्व सहभागी भाविकांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे ज्येष्ठ भाविक बी एम तात्या पुजारी यांनी आभार मानले .या उपक्रमाचे बेलापुर परिसरात कौतुक होत आहे .