*कृषी शिक्षणामुळे भविष्यात मोठे व्यावसायिक,कृषी उद्योजक आणि प्रगतशिल शेतकरी घडतील-कृषीमंत्री दत्तात्रय भरणे.*
*कृषि शिक्षणामुळे भविष्यात मोठे व्यवसायिक, कृषि उद्योजक आणि प्रगतीशील शेतकरी घडतील*
*- कृषिमंत्री मा. ना.श्री. दत्तात्रय भरणे*
*राहुरी विद्यापीठ, दि. 8 सप्टेंबर, 2026*
अनुभवावर आधारित कृषि शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन, उद्योजकतेची क्षमता आणि प्रत्यक्ष काम करण्याचा आत्मविश्वास विकसित होतो. याच अनुभवातून भविष्यात मोठे व्यावसायिक, कृषि उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी घडतील असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी केले.

पुणे येथील विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड येथे महाराष्ट्राचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन केंद्राच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी श्री. भरणे यांनी 227 वर्षे जुना ऐतिहासिक पेशवेकालीन आंबा, आधुनिक रोपवाटिका, जैवविविधता वारसा केंद्र तसेच कृषि पदवी अभ्यासक्रमांतर्गत अनुभवावर आधारित कृषि शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कृषि उत्पादनांच्या प्रदर्शनास भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष श्री. तुषार पवार, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील व सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करताना कृषिमंत्री श्री. भरणे पुढे म्हणाले की आपल्या आयुष्यात आपल्याला घडविणार्या आई-वडिलांचा, शिक्षकांचा आणि प्राध्यापकांचा नेहमी मान राखा. ज्यांनी आपल्याला घडविले त्यांना कधीही विसरू नका. जीवनात आनंद द्या आणि आनंद घ्या, असा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. प्रशांत बोडके यांनी गणेशखिंड संशोधन केंद्राच्या कृषि संशोधनातील योगदानाची माहिती दिली. केंद्राने विकसित केलेले फळे, फुले, भाजीपाला आणि कडधान्य पिकातील विविध वाण शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या भगवा डाळिंब वाणाखाली महाराष्ट्रातील सुमारे 43% क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशाचे श्रेय त्यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सातत्यपूर्ण संशोधनाला दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती यादव यांनी तर आभार डॉ. दत्तात्रय लाड यांनी मानले. यावेळी गणेशखिंड संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचारी तसेच कृषि महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








