क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथे उत्साहात साजरी.

*महापुरुषांचा सकारात्मक दृष्टीकोन आचरणात आणणे ही खरी क्रांती*
*- प्राचार्य डॉ. प्रदीप कदम*
*राहुरी विद्यापीठ, दि. 11 एप्रिल, 2025*
शेतकर्यांना बी बियाणे, अवजारे दिली पाहिजेत. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, शेतकर्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असे म्हणणारे पहिले समाजसुधारक म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा जोेतिबा फुले हे होते. सर्वांना शिक्षणाची गरज आहे असे म्हणणारे व त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे थोर समाजसुधारक होते. क्रांती ही कृतीने होत असते हा दृष्टीकोन देणारे ते पहिले तत्त्वज्ञ होते. यासारख्या महापुरुषांचा सकारात्मक दृष्टीकोन आपल्या आचरणात आणणे ही खरी क्रांती होय असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य डॉ. प्रदीप कदम यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब पवार सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांची 198 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. प्रदीप कदम बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे होते. यावेळी कुलसचिव डॉ. नितीन दानवले, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान व क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रदीप कदम आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की महात्मा फुलेंना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गुरुस्थानी मानत होते. सार्वजनिक सत्यधर्माची संकल्पना त्यांनी मांडली. पुण्याचे आयुक्त म्हणून काम करतांना त्यांनी पुण्यातील सर्व पेठांमध्ये शाळा सुरू केल्या. सर्व पेठांमध्ये बंद नळाद्वारे पाणीपुरवठा योजना राबवली कारण पाणी दूषित होता कामा नये. सर्व रस्ते हे रुंद बनविण्याची योजना आखली व त्या रस्त्याच्या कडेला झाडे लावली. ते उद्योजक होते तसेच राष्ट्र उभारणी करणारे बिल्डरही होते. डॉ. साताप्पा खरबडे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की महात्मा फुलेंनी भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्याद्वारे त्यांनी संपूर्ण देशाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शेतकर्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. समाजातील विषमता दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व याद्वारे राष्ट्र उभारणीचे मोठे कार्य केले. अशा या महामानवाचे विचार आपण आचरणात आणले पाहिजेत असे यावेळी डॉ. खरबडे म्हणाले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. महाविरसिंग चौहान यांनी केले. डॉ. कैलास कांबळे यांनी कवितेद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद उबाळे यांनी तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच पदव्युत्तर महाविद्यालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.