शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत आयोजित प्रशिक्षणात शास्त्रज्ञांनी दिले तंत्रज्ञानाचे धडे .

शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत आयोजित प्रशिक्षणात शास्त्रज्ञांनी दिले तंत्रज्ञानाचे धडे .

*शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत आयोजीत प्रशिक्षणात शास्त्रज्ञांनी दिले तंत्रज्ञानाचे धडे*

*राहुरी विद्यापीठ, दि. 27 जून, 2024*

             महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी पाटील आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठांतर्गत नवी दिल्लीस्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत सोयाबीन व तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर कानडगाव येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, एकात्मिक शेती पध्दती संशोधन प्रकल्पाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे, तूर रोग शास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण, श्री. नाना गागरे व श्री. लक्ष्मण गागरे उपस्थित होते.

             यावेळी डॉ. कुटे मार्गदर्शन करतांना म्हणाले की तुरीचा बाजार भाव वाढत असल्याने शेतकर्यांनी उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास तुरीच्या उत्पादनात वाढ होईल. तूर हे पैसे देणारे पीक ठरत आहे. तूर हे खरिपाचे महत्त्वाचे पीक आहे. पेरणीच्या वेळी बीज प्रक्रिया केली तर रोग येणार नाही. डॉ.आदिनाथ ताकटे यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी शेतीमधून गुणवत्तापूर्ण व अधिक उत्पादनासाठी शेतकर्यांनी नियोजन करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. तुरीवरील रोग व्यवस्थापन या विषयावर डॉ. विश्वास चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉ. अरविंद तोत्रे यांनी शेतकर्यांनी विकसित केलेला किंवा जतन केलेल्या वाणाचे नोंदणी कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कानडगावचे माजी सरपंच लक्ष्मण गागरे यांनी तुर व सोयाबीन आंतरपीक याविषयी मनोगत व्यक्त केले व विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवले याविषयी शेतकर्यांना सांगितले.

            कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री. विजय शेडगे, प्रक्षेत्र सहाय्यक व राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले.