बैलपोळ्याच्या सणावर दुष्काळाचे सावट,यंदाचा पोळा कोरडाच,शेतकरी चिंताग्रस्त.
उद्याच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट!
यंदा पोळा कोरडा !
कपाशी-सोयाबीन मका, तुर चातकासारखी पावसाची वाट पाहत; हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची वेळ, शेतकरी चिंतेत .
अहिल्यानगर(प्रतिनिधी) : संभाजी शिंदे पाटील
शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि कृषी संस्कृतीशी अतूट नाते सांगणारा बैलपोळ्याचा सण उद्या साजरा होत आहे. मात्र यंदाच्या पोळ्यावर दुष्काळी परिस्थितीचे गडद सावट पसरले असून, शेतकऱ्यांच्या आनंदावर चिंतेची छाया दिसून येत आहे. बैलांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असला, तरी यंदा शेतकऱ्यांच्या मनात उत्साहापेक्षा पावसाची आस आणि शेतीच्या भवितव्याची चिंता अधिक आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने शेतशिवारातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कपाशी आणि सोयाबीनची पिके अक्षरशः चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाच्या दोन-चार सरींची आस लागली आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
पेरणीपासून आतापर्यंत शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला खर्च, घेतलेले कर्ज आणि केलेले कष्ट याचा विचार केला तर आता हातातोंडाशी आलेला घास फिरवण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीतील ओल कमी होत असल्याने पिकांची वाढ खुंटत आहे. कपाशीची पाने कोमेजण्याची चिन्हे दिसत असून, सोयाबीनलाही पावसाच्या दमदार सरींची नितांत गरज आहे.
दरवर्षी पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांची सजावट, रंगरंगोटी आणि पूजेची तयारी मोठ्या उत्साहाने करतात. बाजारपेठेतही सणाची लगबग दिसून येते. मात्र यंदा आर्थिक अडचणी आणि शेतीच्या संकटामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्साहावर मर्यादा आल्या आहेत. बैलपोळा साजरा करायचा, पण शेतात उभ्या असलेल्या पिकांचे काय? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसला आहे.
बैल हा शेतकऱ्याच्या शेतीचा साथीदार. त्याच्या कष्टावरच वर्षानुवर्षे शेतीची चाकं फिरली. त्यामुळे उद्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची मनोभावे पूजा करणार असला, तरी त्याचवेळी आकाशाकडे पाहत “आता तरी पाऊस पडू दे आणि आमची पिके वाचू दे,” अशी मनोमन प्रार्थना करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी शासनाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
उद्याचा पोळा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असला, तरी यंदा या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पावसाची आस आणि मनात पिकांच्या भवितव्याची चिंता दिसत आहे.








