बाभळेश्वर येथे मोठा अपघात, चेष्टा भोवली

बाभळेश्वर येथे मोठा अपघात, चेष्टा भोवली

बाभळेश्वर येथे मोठा अपघात, चेष्टा भोवली.

प्रतिनिधी : प्रसाद घोगरे : 9370328944

बाभळेश्वर (ता. राहता) – बाभळेश्वर–लोणी रोडवरील म्हसोबा मंदिरासमोर आज सायंकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खडीने भरलेल्या टिप्पर आणि पिकअप वाहनांची समोरासमोर धडक होऊन मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन्ही चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर हकीगत अशी की, लोणीकडून बाभळेश्वरकडे जाणाऱ्या खडी वाहतुकीच्या टिप्परला बाभळेश्वरकडून लोणीकडे येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिली. धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, चालकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही चालक संगमनेर तालुक्यातील असून ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप चालकाने आपल्या मित्राला कट मारण्याच्या नादात ही दुर्घटना घडली.

या बेफिकीर स्टंटमुळे स्वतःचे तसेच इतरांचे जीव धोक्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नागरिकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, अशा बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
सदर अपघाताची चौकशी करून दोषी चालकांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांचे वाहन परवाने रद्द करावेत, जेणेकरून पुढील काळात अशा घटना घडू नयेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

विशेष म्हणजे एवढा मोठा अपघात घडूनही पोलिस घटनास्थळी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले. सदर अपघात प्रकरणी पोलिस कोणती भूमिका घेतात, याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.