सेवा संकल्प अभियान - 2026 चा महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुभारंभ

सेवा संकल्प अभियान - 2026 चा महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुभारंभ

*सेवा संकल्प अभियान-2026 चा महात्मा फुले कृषि विद्यापीठात शुभारंभ*

*डाळिंब बागायतदारांच्या अनुभवातून संशोधनाला नवी दिशा देणार*

*- कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

 डाळिंब शेतीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाने उल्लेखनीय संशोधन करून भगवा आणि फुले सुपर भगवा यांसारखे वाण शेतकऱ्यांना दिले आहेत. मात्र बदलते हवामान, नवनवीन रोग-किडी आणि उत्पादनातील बदलती आव्हाने यामुळे डाळिंब शेतीसमोर सातत्याने नवी आव्हाने निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर डाळिंब बागायतदारांच्या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेऊन यापुढील डाळिंब संशोधनाची दिशा ठरविण्यात येईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

  राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियान-2026 अंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागातील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्पाच्या वतीने डाळिंब : शेतकरी- शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यातील प्रगतशील डाळिंब बागायतदार आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्यात थेट, अभ्यासपूर्ण आणि फलदायी संवाद घडून आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास खर्चे होते. यावेळी संचालक संशोधन डॉ. प्रशांत बोडके, संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाने, उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भरत पाटील, पुणे येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कराड कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संग्राम धुमाळ, तसेच प्रगतशील डाळिंब बागायतदार श्री. ब्रह्मदेव दुधाळ, श्री. प्रकाश बाफना, श्री. विठ्ठल भोसले आणि श्री. संतोष पन्हाळे उपस्थित होते.

 कुलगुरू डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतावर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे संशोधनातून मिळाली पाहिजेत. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील संवाद जितका अधिक सखोल होईल, तितके संशोधन अधिक परिणामकारक आणि शेतकरीकेंद्रित होईल. या सुसंवादातून मिळणारे प्रत्याभरण विद्यापीठाच्या आगामी संशोधनासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे. या संवादामुळे डाळिंब संशोधनाला नवी दिशा मिळणार असून सेवा संकल्प अभियानाचा शेतकरीकेंद्रित उद्देश अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    यावेळी सेवा संकल्प अभियान-2026 चा शुभारंभ करण्यात आला. संचालक संशोधन डॉ. प्रशांत बोडके आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाने यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रगतशील डाळिंब बागायतदार श्री. ब्रह्मदेव दुधाळ यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठाच्या संशोधनाचे कौतुक करताना सांगितले की, ङ्गमहात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या भगवा आणि फुले सुपर भगवा या वाणांमुळे डाळिंब बागायतदारांना करोडपती केले आहे.या वाणांनी अनेक शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग दाखविला आहे. बाजारात जैविक खतांची मोठी मागणी असली तरी त्याबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगून विद्यापीठाने डाळिंब बागायतदारांसाठी जैविक खते तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणारे कुलगुरू आम्ही प्रथमच पाहत आहोत,ङ्घ असे गौरवोद्गार त्यांनी काढले यावेळी सर्व डाळिंब बागातदारांनी काढले.

 या सुसंवादामध्ये डाळिंब उत्पादनातील विविध समस्या व आव्हाने, बदलते हवामान, आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढ, फळांची गुणवत्ता, निर्यातक्षम उत्पादन, रोग-किडींचे व्यवस्थापन, जैविक निविष्ठा आणि बाजारपेठेतील बदल आदी विषयांवर शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात अतिशय शास्त्रशुद्ध, अभ्यासपूर्ण आणि खुलेपणाने विचारमंथन झाले. प्रगतशील डाळिंब बागायतदारांनी आपल्या प्रत्यक्ष शेतीतील अनुभवांच्या आधारे मांडलेल्या अडचणी, सूचना आणि अपेक्षांमधून विद्यापीठाच्या आगामी संशोधनासाठी मोलाचे प्रत्याभरण प्राप्त झाले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ संवादापुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या अनुभवातून संशोधनाची दिशा आणि संशोधनातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय या विचाराला प्रत्यक्ष अधोरेखित करणारा ठरला.

 यावेळी सहभागी सर्व डाळिंब बागायतदारांचा कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यापीठाच्या इतिहासात डाळिंब बागायतदारांसोबत अशा प्रकारचा थेट आणि व्यापक सुसंवाद प्रथमच आयोजित करण्यात आल्याने उपस्थित बागायतदारांनीही एकत्रितपणे कुलगुरू डॉ. विलास खर्चे तसेच विद्यापीठातील सर्व संचालकांचा सन्मान करून या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख, उद्यानविद्या विभागातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवयी यांनी केले, तर आभार डॉ. जितेंद्र ढेंबरे यांनी मानले.