महात्मा फुले कृषी विद्यापीठात देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न,देशाच्या विकासात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान - कुलगुरू डॉ. पी . जी . पाटील
*महात्मा फुले कृषी विद्यापीठात देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न*
*देशाच्या विकासात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे भरीव योगदान*
*- कुलगुरु डॉ. पी. जी.पाटील*
*राहुरी विद्यापीठ, दि. 15 ऑगस्ट, 2024*
विद्यापीठ स्थापनेपासून गेल्या 56 वर्षामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शेतकर्यांसाठी विविध पिकांचे 300 पेक्षा जास्त वाण प्रसारीत करुन देशामधील इतर कृषि विद्यापीठांच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तीनही विभागात हे विद्यापीठ चांगली कामगिरी करत आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या शुभहस्ते विविध पिकांचे 109 जैवसंवर्धीत वाण देशाला अर्पण करण्यात आले. त्यामध्ये विद्यापीठाचे तूर या पिकाचा फुले पल्लवी व चारधारी वाल फुले श्रावणी या दोन वाणांचा समावेश आहे. अशा प्रकारे देशाच्या विकासात कृषि विद्यापीठ भरीव योगदान देत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण केल्यानंतर मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. पी. जी.पाटील बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, प्रभारी नियंत्रक डॉ. भरत पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके, सर्व विभाग प्रमुख, एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे व सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विद्यापीठ उसाची शाश्वत उत्पन्नवाढ व कार्बन क्रेडीट वाढीसाठी सात साखर कारखान्यांच्या माध्यमातून सात तालुक्यांमधील 260 गावांमध्ये प्रकल्प राबवित आहे. यामुळे विद्यापीठाचे तंत्रज्ञान सात हजार शेतकर्यापर्यंत प्रत्यक्षपणे पोहचणार आहे. पुणे कृषि महाविद्यालयातील देशी गाय संवर्धन प्रकल्पासाठी शासनाने भरीत तरतुद केल्यामुळे देशी गाय संवर्धन व संशोधनास गती मिळणार आहे. विद्यापीठ राबवित असलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच संशोधनासाठी मिळालेले तीन पेटंट, जॉइंट अॅग्रेस्कोमध्ये सहा वाण, पाच अवजारे व 89 तंत्रज्ञान शिफारशी सादर करुन संशोधन कार्यातही इतर विद्यापीठांच्या तुलनेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाने भरीव कामगिरी केले असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील प्रक्षेत्रावर वनमहोत्सव कार्यक्रम 2024 चे आयोजन करण्यात आले होते. पदव्युत्तर महाविद्यालयाच्या वसतीगृहमागील उद्यानविद्या प्रक्षेत्र व बियाणे विभागाचा ब गट या दोन ठिकाणी केशर आंब्याची 500 व जांभळाची 100 कलमांचे वृक्षारोपण विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन डॉ. आनंद सोळंके, डॉ. भरत पाटील, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. गोकुळ वामन, डॉ. सचिन मगर व श्री. बुवासाहेब मस्के या अधिकार्यांनी केले. यावेळी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिराचेही आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. महावीरसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे यांनी परेडचे संचालन केले. सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे यांनी सूत्रसंचालन केले. स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.