महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभागामार्फत आदिवासी पशुपालक शेतकऱ्यांना ओट चारा बियाण्याचे मोफत वाटप .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बियाणे विभागामार्फत आदिवासी पशुपालक शेतकर्यांना ओट चारा बियाण्याचे मोफत वाटप*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या बियाणे विभागाच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातुन डॉ. हेडगेवार समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आयोजित 18 व्या कृषि तंत्रज्ञान महोत्सवात पशुपालक परिषदेचे औचित्य साधून आदिवासी पशुपालक शेतकर्यांना ओट चारा बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलसचिव तथा प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. नितीन दानवले यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या पशुपालक परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या संचालिका सौ. अर्चनाताई वळवी तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. तुषार गिते व पशुधन सल्लागार डॉ. महेश गणापुरे उपस्थित होते. यावेळी सौ. अर्चनाताई वळवी यांनी दुग्धव्यवसाय व दुधसंकलन अधिकाधिक करण्याचे आवाहन उपस्थित पशुपालकांना केले. डॉ. तुषार गिते यांनी दुग्धव्यवसाय, शेळी व कुक्कुटपालन व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन केले.
यावेळी तांत्रिक मार्गदर्शनात बिजोत्पादन अधिकारी डॉ. कैलास गागरे व बियाणे विपणन अधिकारी डॉ. दिलीप ठाकरे यांनी पशुपालकांना ओट चारा लागवड तंत्रज्ञान या विषयीचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पशुवैद्यकीय विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. आदित्य देशपांडे यांनी तर आभार कार्यक्रम सहाय्यक श्री. प्रविण चव्हाण यांनी मानले. या पशुपालक परिषदेसाठी परिसरातून मोठया प्रमाणावर पशुपालक शेतकरी व होते सेवाभावी संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते.