नगर - मनमाड रस्त्यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष, डिग्रस येथील महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू .

नगर - मनमाड रस्त्यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष, डिग्रस येथील महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू .

अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड हायवे हा हायवे फक्त नावालाच उरला असून तो आता मृत्यूचा सापळा बनला आहे .आज सकाळी डिग्रस येथील महिलेचा अपघातात मृत्यू झाला आहे .या रस्त्यावरून जाताना अनेक समस्यांना तोंड देत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे .

 

            डिग्रस येथील महिला सौ मीरा राधाकिसन तागड वय वर्ष 38 या आपल्या पतीसोबत दवाखान्यात जाण्यासाठी निघाल्या होत्या . डिग्रस गावापासून काही अंतरावरच असलेल्या नगर मनमाड हायवेवर प्रवेश करतानाच त्यांचा अपघात झाला व त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला . त्यांचे पतीही जखमी झाले आहेत . त्यांच्या पश्चात 3 मुली 1 मुलगा, पती व सासू असा त्यांचा परिवार आहे . त्यांच्या अपघाती निधनाने डिग्रसच्या गावकऱ्यांमध्ये नगर-मनमाड रस्ता व प्रस्थापितां विषयी प्रचंड चिड निर्माण झाल्याचे दिसून येत आहे . गेल्या दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा खड्डा चुकवतांना मृत्यु झाला होता.

 

          या रस्त्यावरून प्रवास करताना दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनात येत आहे .विस्ताराने मोठा असणाऱ्या व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या नगर जिल्ह्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रवासी येत असतात .या रस्त्यावरून जाताना प्रत्येक प्रवासी हा नगर जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी व शासकीय अधिकारी यांना शिव्यांचा आशीर्वाद देऊनच प्रवास करत आहे .नगर मनमाड हायवे हा त्याच्या दयनीय अवस्थेमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात गाजत आहे .इतर जिल्ह्यातील रस्त्यांच्या तुलनेत नगर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था फार वाईट झाल्याचे दिसत आहे .

 

        या रस्त्यावरून जाणारे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक ,जिल्ह्याच्या ठिकाणी जाणारे नोकरदार वर्ग, जड वाहतूक करणारे प्रवासी,विविध तीर्थक्षेत्रांना जाणारे प्रवासी,पेशंट घेऊन जाणारे ॲम्बुलन्स अशा सर्वांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करूनच प्रवास करावा लागत आहे .तसेच खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे .या होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे .विकास कामाच्या नावाखाली जनतेसमोर भोळा चेहरा घेऊन फिरणारे प्रतिनिधी अशा घटना घडल्यावर रस्त्यावर का उतरत नाही असा प्रश्न पडतो .विविध संघटना रस्ता व्हावा म्हणून झटत आहे परंतु नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी का मौन बाळगून आहे ?असा सवाल आता जनतेमधून होत आहे .लवकरात लवकर या रस्त्याविषयी निर्णय घेण्यात यावा अन्यथा जनतेच्या रोशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा तिखट सूर जनतेतून निघत आहे .