श्रीरामपूर तालुका समन्वय बैठकीत आमदार कानडे यांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर, विभाग निहाय पुन्हा बैठका घेण्याचे आदेश

श्रीरामपूर तालुका समन्वय बैठकीत आमदार कानडे यांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर, विभाग निहाय पुन्हा बैठका घेण्याचे आदेश

श्रीरामपूर - सरकार राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती व्यवस्थितरित्या  देऊ न शकल्याने आमदार लहू कानडे यांनी समन्वय बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. काही विभागाच्या स्वतंत्र बैठका घेण्याचे यावेळी त्यांनी आदेश दिले. सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आज समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, प्रा. कार्लस साठे, मल्लू शिंदे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, सरपंच अशोक भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अ वकील समीन बागवान, रज्जाक पठाण, यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

                आ. कानडे यांनी यावेळी पंचायत समिती, महसूल, कृषी, महावितरण, पाटबंधारे, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम असा विभाग निहाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी बहुतेक विभागाच्या अधिकाऱ्यांना योजनांची सविस्तरपणे माहिती देता आली नाही. त्यामुळे आ. कानडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले. योजनांच्या कामाचा अनेक ठिकाणी फलक नसल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोणीही कोणाच्या नावाचे फलक लावत आहेत, यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे. ज्या ठिकाणी योजनांचे फलक नाहीत तेथे ते तातडीने लावावेत, अशी सूचना त्यांनी केली.

                कृषी पिक विमा व ई - पिक पाहणी याबाबत कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये समन्वय नसल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे उद्या दि. 22 रोजी दुपारी 3 वा. कृषी विभागात आढावा बैठक घेण्याचे आदेश आ. कानडे यांनी यावेळी दिले. तालुक्यात पानंद रस्त्यांची 74 कामे मंजूर केले आहेत. या कामाचा निधी परत जाता कामा नये, या कामासाठी एजन्सी म्हणून ग्रामपंचायतीकडे वर्ग करावे. त्या स्तरावर ही कामे करून घेता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या लोकांचे अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतु ती केली जात नाहीत, याशिवाय गोदावरी नदी परिसरातील पूररेषेतील नऊ गावांना गावठाण मंजूर होवूनहि जागेचे वाटप न झाल्याने तेथे लोकांना घरे नाहीत. नगरपालिका हद्दीतील व तालुक्यातील अतिक्रमणांची यादी तातडीने द्यावी. यासाठी 26 ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक घेण्याचे त्यांनी सुचविले.

                  नुकत्याच झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याचे आवर्तन वाचले. या पाण्यातून टाकळीभान टेलटॅंक तसेच गावगावचे पाझर तलाव व बंधारे भरून द्यावेत. ज्या ठिकाणी पाऊस नाही तेथे आवर्तन घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. जलसंधारणाची अनेक कामे भांडून मंजूर करून आणली. अद्याप कामे सूर झालेली नाहीत, तो निधी खर्च करता येत नसेल तर ती शरमेची बाब असल्याची खंत आ. कानडे यांनी व्यक्त केली. गावगाव जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू असून या योजनेचे बिले काढण्यासाठी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत. नागरिकांनी ग्रामसभेत मंजुरी घेतल्याशिवाय या योजनेला मंजुरी देऊ नये, असे ते म्हणाले.

               अंगणवाडीतील पोषण आहार निकृष्ट असल्याच्या तक्रारी असून त्याचे  वेळचे वेळी तपासणी करावी, लाडकी बहीण योजना ही जनतेच्या टॅक्समधून गोळा केलेल्या पैशातून राबविले जात आहे. ती कोणाच्या खिशातून होत नाही. त्यामुळे सर्वांना या योजनेचा लाभ घेण्याचा हक्क आहे. तो मिळवून दिला पाहिजे. तालुक्यात  20 शाळा खोल्या मंजूर असून या खोल्यांचे काम तातडीने हाती घ्यावे, असे त्यांनी सूचित केले.

                 यावेळी सरपंच सागर मुठे, अनिल ढोकचौळे, नानासाहेब बडाख, विष्णुपंत खंडागळे, सुरेश पवार, पी. एस. निकम, नानासाहेब रेवाळे, रज्जाक पठाण, राजेंद्र कोकणे, रावसाहेब बडे यांनी बैठकीत प्रश्न मांडले. यावेळी रमेश आव्हाड, रमेश उंडे, दीपक कदम, भैय्या शहा, रफिक शेख, प्रताप पटारे, मुदस्सर शेख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, आबा पवार, सरपंच अविनाश पवार, भागचंद नवगिरे, सलीमखान पठाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.....