सुखी व आनंदी जीवन आपल्याला हवे असेल तर पृथ्वीवर एकच माध्यम आहे ते म्हणजे भगवंत सेवा - बाल कीर्तनकार कु.ईश्वरीताई जावळे.
कोपरगांव - येथील श्री क्षेत्र नगदवाडी गावी सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सप्ताहाच्या द्वितीय दिवशी बाल कीर्तनकार कु.ईश्वरीताई बाबासाहेब जावळे यांची सुश्राव्य किर्तन सेवा पार पडली.
सदर किर्तन सेवेमध्ये त्यांनी 'माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचि देव होय गुरु' या अभंगाचे प्रमाणबद्ध निरूपण केले. किर्तनप्रसंगी त्यांची देहबोली,हावभाव,आवाजातील चढ-उतार व सुस्वर गायन यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते. इतक्या लहान वयात तंतोतंत उदाहरणे व दाखले देऊन अप्रतिम असे किर्तन सादर केल्याबद्दल पंचक्रोशीत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.पिंगळा गायन हे या कीर्तनाचे मुख्य आकर्षण ठरले.त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांना कुटुंबियांचे श्री.किशोर महाराज जावळे तसेच भागवताचार्य सौ.कविता साबळे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. नगदवाडी गावातील ग्रामस्थ,सप्ताह समिती,भजनी मंडळ या सर्वांचे ही विशेष सहकार्य लाभले.मनुष्य देह हा अनमोल आहे आणि याच जन्मात भगवंताचे कार्य करण्याचे सौभाग्य आपल्याला मिळते. तेव्हा सर्वांनी भगवंताचे नामस्मरण करावे व सुखी व आनंदी जीवन आपल्याला हवे असेल तर पृथ्वीवर एकच माध्यम आहे ते म्हणजे भगवंत सेवा असा संदेश त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिला.
ईश्वरी ताई जावळे या सोनेवाडी परिसरातील श्री.गंगाधर पोपट जावळे यांची नात असून त्यांना लहानपणापासूनच गायन व कीर्तनाची आवड आहे.शालेय शिक्षणाबरोबरच त्यांची ही आवड जोपासली जावी म्हणून कुटुंबीयांनी श्री पंचतत्व वारकरी शिक्षण संस्था सांगवी येथे त्यांचे नाव दाखल केले.या संस्थेचे अध्यक्ष श्री.सागर महाराज घुमरे व सौ.कावेरी माई घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरी ताई गेल्या एक वर्षापासून वारकरी संप्रदायाचा अभ्यास करीत आहेत.