*मुलांचे भावविश्व समृद्ध करून त्यांचे बालपण बहरू दया..... मीनाताई जगधने*

*मुलांचे भावविश्व समृद्ध करून त्यांचे बालपण बहरू दया.....   मीनाताई जगधने*

श्रीरामपूर --
   मुलांचे भावविश्व समृद्ध होऊन त्यांचे  बालपण बहरण्यासाठी शाळेबरोबरच पालकांची ही भूमिकाही अतिशय महत्वाची आहे. मुलांचे व्यक्तिमत्व घडत असतांना त्यांच्या नैसर्गिक कृतीना संस्कार, कृतियुक्त आनंददायी अनुभवांची जोड देऊन त्यांच्या जाणिवा अधिक विस्तृत करण्यासाठी पालकांनी सातत्याने शाळेशी जोडले पाहिजे असे विचार रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या तथा सावित्रीबाई फुले बालसंस्कार केंद्राच्या संस्थापिका माननीय  मीनाताई जगधने यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले बालसंस्कार केंद्राच्या वतीने आयोजित पालक सभेच्या प्रसंगी पालकांशी संवाद  साधताना माननीय मीनाताई जगधने यांनी विविध उदाहरणाद्‌वारे पालकांना सुजाण पालकत्व कसे असावे याविषयी संबोधित केले.पालक शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारीणीवर काम करत असतांना राज्यभरातील विद्यार्थी पालक यांच्याशी सातत्याने साधलेला संवादातून बालकाप्रती पालकांची असलेली भूमिका किती सजग असावी हे त्यांनी पटवून दिले. "दूध-तूप-शिरा" या प्रतिकांच्या माध्यमातून त्यांनी पालकांना सांगितले की या तीन बाबी विशेष ध्यानात ठेवा; "दु"म्हणजे दुर्लक्ष करू नका, "ध" म्हणजे धमकी देऊ नका; "तु" म्हणजे तुलना करू नका, "प"म्हणजे परस्पर निर्णय घेऊ नका. "शिरा"मधील "शि"म्हणजे अतिरेकी शिस्त नको. "रा" म्हणजे रागावू नका; अशा अनेक विवीध उदाहरणांनी पालकत्वाची खरी व्याख्या अगदी सहजपणे पालकांना समजावली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख सौ. सोनाली पऱ्हे यांनी केले .कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन ऐश्वर्या सोनार यांनी केले. कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांचे व पालकांचे आभार शितल तोडकर यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एस. के. सोमय्या विद्यामंदिरचे मुख्याध्यापक माननीय श्री. संजय दवंडे यांनी बालवाडी व्यवस्थापनात पालकांची भूमिका तसेच विद्यार्थ्यांच्या आदर्श सवयी व जडणघडण याबाबत मार्गदर्शन केले. पालक मेळाव्याच्या निमित्ताने माननीय मीनाताई जगधने यांच्या संकल्पनेतून अतिशय नाविन्यपूर्ण व अगदी बालवाडीच्या मुलापासून तर सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी वाढवून त्यांच्यावर वाचन संस्कार रुजतील अशा रीतीने तयार होत असलेल्या अनोखा वाचनालयाला पालकांनी भेट दिली. स्वतः ताईंनी त्यांच्या वाचन प्रेमातून विद्यार्थ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अशा ग्रंथालयाची विद्यालयात उभारणी केली आहे. मिनाताईंच्या समवेत ग्रंथालय पाहणी करताना पालक भारावून गेल्याचे दिसून आले. सदर पालकांसाठी पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालवाडीच्या शिक्षिका ऐश्वर्या सोनार, पौर्णिमा काळे, सोनाली पऱ्हे, शितल तोडकर, पूनम कर्डक, तसेच हाऊस किपिंग स्टाफ यांनी प्रयत्न केले.

(प्रतिनिधी- दिपक कदम बीपीएस न्यूज श्रीरामपूर)