पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रावर मुलभूत बियाणे विक्री व बेणे वाटपाचा शुभारंभ .

पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रावर मुलभूत बियाणे विक्री व बेणे वाटपाचा शुभारंभ .

*पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रावर मुलभूत बियाणे विक्री व बेणे वाटपाचा शुभारंभ*

*राहुरी विद्यापीठ, दि. 9 ऑक्टोबर, 2024*

           महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पाडेगांव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रामध्ये मुलभूत ऊस बियाणे विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.चे चेअरमन श्री. पुरूषोत्तम जगताप, को 86032 या वाणाचे जनक व माजी ऊस पैदासकार डॉ. आर. वाय. जाधव आणि ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे उपस्थित होते. यावेळी इस्लामपूरचे श्री. प्रफुल्ल जाधव, साप येथील श्री. कार्तिक अडसूळ, बारामतीचे श्री. गणपत वायाळ, श्रीगोंदा येथील श्री. रमेश काटे, दौंडचे श्री. राजाराम भोसले, रहिमतपूर येथील श्री. संदीप गायकवाड या प्रगतशील शेतकर्यांना फुले 265 या ऊस वाणाच्या मुलभूत बेणेमळयातील पहिली मोळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देवून बियाणे विक्री व वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. 

           याप्रसंगी श्री. पुरूषोत्तम जगताप म्हणाले की सोमेश्वर कारखाना स्थापनेपासून तो पूर्णक्षमतेने चालविण्यासाठी ऊसाची कमतरता भासत असल्यामुळे शेजारील जिल्हयातून गेटकेन ऊस आणावा लागत होता. परंतु पाडेगाव संशोधन केंद्राने सन 2007 मध्ये प्रसारित केलेल्या फुले 265 वाणामुळे सन 2009-10 मध्ये कारखाना कार्यक्षेत्र व निरा नदी काठावरील चोपन जमिनीमध्ये फुले 265 या वाणाची अधिक उत्पादन व साखर देणार्या वाणाची लागवड झाल्यामुळे कारखाना ऊस पुरवठयाबाबत स्वयंपूर्ण झाला. सोमेश्वर कारखान्याचे सभासद असलेले सर्व प्रगतशील शेतकरी यांनी शेतीमध्ये बारकाईने लक्ष दिल्याने अधिक उत्पादन घेवून स्वतः बरोबरच कारखान्याची आर्थिक प्रगती साधली आहे. यामुळे बघता-बघता सोमेश्वर कारखाना 2500 चा 5000, 5000 चा 7500 टन प्रति दिन क्षमतेवरून आज कारखाना 9000 प्रति दिन टन क्षमतेने कार्यरत असून सुध्दा आम्हाला कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस संपत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाटा व श्रेय महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावला जात आहे असे मला या ठिकाणी सांगावेसे वाटते. मला अभिमान आहे की, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रासारखी राज्यस्तरावर ऊसामध्ये काम करणारी अग्रगण्य संस्था आमच्या कारखाना परीसरात असून ती आमच्या कारखान्याची सभासद सुध्दा आहे. ऊस संशोधन केंद्राच्या सहकार्यामुळे आम्ही कोल्हापूर व सातारा जिल्हयाबरोबरच कारखाना सभासदांना उच्चांकी दर दिलेला आहे. ऊस पिकाविषयी असणार्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी येथील कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांचे नेहमीच सहकार्य होत आहे. पाडेगाव संशोधन केंद्राने मागील तीन वर्षात प्रसारीत केलेले नवीन वाण फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 आणि फुले ऊस 15006 या पाण्याचा ताण सहन करणारे आणि चोपण जमिनीत अधिक उत्पादन देणारे नवीन वाण आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये दरवर्षी उपलब्ध होत आहे. राज्यातील सर्व शेतकर्यांनी नवीन वाणांची जास्तीत जास्त लागवड करून उत्पादनात वाढ करावी असे आवाहन श्री. जगताप यांनी केले. 

         *पाडेगाव ऊस संशोधन केंद्र शेतकरी आणि साखर कारखाने यांच्या प्रगतीकरीता निरंतर प्रयत्नशील आहे. या संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या नवीन ऊस वाणांच्या बेण्याचा सर्व साखर कारखान्यांनी नवीन लागवडीसाठी उपयोग करावा-डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी*

           यावेळी डॉ. राजेंद्र भिलारे मार्गदर्शन करतांना म्हणाले की पाडेगाव संशोधन केंद्रावर सध्या 55 एकर क्षेत्रावर विविध ऊस वाणांचे मुलभूत बियाणे मळे उभे आहेत. ऊसाच्या मुलभूत बियाण्यापासून कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत बेणे मळे तयार करून शेतकर्यांना बेणे पुरवठा करण्यात येतो. सध्या या संशोधन केंद्राने महाराष्ट्रासाठी 2022 साली शिफारशीत केलेला वाण फुले ऊस 15012, 2023 साली राष्ट्रीय स्तरावर द्विकल्पीय उष्णकटीबंधीय प्रदेशामधील 7 राज्यांसाठी प्रसारीत झालेला फुले ऊस 13007 आणि 2024 साली महाराष्ट्र राज्यातील तिन्ही हंगामाकरीता शिफारशीत फुले ऊस 15006 या वाणाचे मोठया प्रमाणावर मुलभूत बियाणे मळे केंद्रामार्फत तयार केलेले आहेत. त्याचबरोबर को 86032, फुले 265, फुले 10001, फुले 9057, फुले 11082 या वाणांचे बियाणे उपलब्ध होणार आहेत. चालू वर्षी साधारणपणे 1.00 कोटी दोन डोळा टिपरी बियाणे विक्रीस उपलब्ध होणार आहे. 

           याप्रसंगी को 86032 या वाणाचे जनक व माजी ऊस पैदासकार डॉ. आर. वाय. जाधव यांचा ऊस पिकातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल संशोधन केंद्रामार्फत विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी ऊस संशोधन केंद्रातील ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे, ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे, ऊस मृदाशास्त्रज्ञ डॉ. कैलास काळे, ऊस शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री. बापूराव गायकवाड आणि ऊस विकास अधिकारी, श्री. विराज निंबाळकर, वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. दत्तात्रय थोरवे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. किरणकुमार ओंबासे, डॉ. माधवी शेळके, श्री. राजेंद्र पांढरे, श्री. संतोष शिंदे, श्री. दिनेश पाटील व श्री. भाऊसाहेब बेल्हेकर हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी केले. या केंद्रातून बियाणे खरेदीसाठी बियाणे विक्री अधिकारी डॉ. दतात्रय थोरवे मो.नं. 9881644573 व श्री. अनिल डुबल मो.नं. 9604149088 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी केले आहे.