मंदिरातील दानपेटी व मोटरसायकल चोरीतील आरोपी मुद्देमालासहित अटक,राहुरी पोलिसांची दमदार कारवाई.
राहुरी तालुक्यात मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण व तहाराबाद येथिल मंदिरातील चोरिचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात यावी असे आदेश राहुरी पोलिसांना दिले होते .या आदेशानुसार राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी वेळोवेळी नाकाबंदी केली होती तसेच संशयीत आरोपी दिसताच राहुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले होते .
तपास यंत्रणेचे काम चालू असतानाच पोलीस निरीक्षक डांगे यांना कानडगाव परिसरात दोन इसम संशयीतरित्या मोटरसायकलवर फिरत असल्याची माहिती मिळाली .या घटनेची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक डांगे यांनी सपोनि राजेंद्र लोखंडे, पोसई निरज बोकिल, पोहेकॉ जानकिराम खेमनर, पोना रामनाथ सानप, पोकॉ सचिन ताजणे, आजिनाथ पाखरे, अमोल पडोळे, प्रमोद ढाकणे, अविनाश दुधाडे, फुंदे, नदिम शेख यांचे पथक तयार करून घटनेची माहिती देऊन आरोपींना ताब्यात घेण्यास सांगितले .या पथकातील सर्वांनी कानडगाव परिसरात सापळा रचून आरोपी महेश चांगदेव लोंढे (वय 22 वर्षे ) व रोहिदास सुभाष संसारे ( वय 19 वर्षे )या दोन आरोपींना मोटरसायकल सहित ताब्यात घेतले .दोन्ही आरोपींना राहुरी पोलीस स्टेशन येथे आणून चौकशी केली असता राहुरी तालुक्यातील ताराबाद येथील संत महिपती महाराज मंदिरातील दानपेटी फोडल्याचे तसेच आठ मोटरसायकल चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले आहे .चोरी केलेला मुद्देमाल राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून यामध्ये विविध कंपनीच्या क्रमांक असणाऱ्या चार मोटरसायकल व विनाक्रमांकाच्या चार मोटरसायकल चोरांकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत .
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे व त्यांच्या पथकाने केली आहे .राहुरी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे .या कारवाईनंतर राहुरी पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना सुचनाही देण्यात आल्या आहेत .आपली वाहने व्यवस्थित सुरक्षित स्थळी पार्किंग करावी तसेच विना क्रमांक मोटरसायकलवर संशयितरित्या कोणी फिरत असेल तर तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनशी 02426232433 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे .