महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 5 वाण,3 कृषियंत्रे आणि 69 कृषी तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता .

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 5 वाण,3 कृषियंत्रे आणि 69 कृषी तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे 5 वाण, 3 कृषि यंत्रे, आणि 69 कृषि तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता*

*राहुरी विद्यापीठ, दि. 27 मे, 2023*

          महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषि विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 51 वी बैठकीचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठात करण्यात आले होते. 

       

                महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या नेतृत्वाखाली या कृषि विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या व त्यास समितीने मान्यता दिली. या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे 5 वाण, 3 कृषि यंत्रे अवजारे आणि 69 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. यामध्ये भात-फुले कोलम, भात-फुले सुपर पवना, मका-फुले उमेद, मका-फुले चॅम्पीयन, ऊस-फुले 13007 हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरचलीत फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्र, विद्युतमोटारचलीत फुले भुईमुग शेंगा फोडणी व वर्गवारी यंत्र, फुले रस काढणी यंत्र प्रसारीत करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी दिली. प्रसारीत वाण 

1. भात-फुले कोलम : भाताचा फुले कोलम (व्ही.डी.एन.-1832) हा अधिक उत्पादन देणारा निमगरवा, आखूड बारीक दाण्याचा वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.  

2. भात-फुले सुपर पवना : भाताचा फुले सुपर पवना (आयजीपी-13-12-19) हा अधिक उत्पादनक्षम, बुटका, निमगरवा, सुवासीक, लांबट बारीक दाण्यांसह तांदळाची उत्तम गुणवत्ता असलेला वाण पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.

3. मका-फुले उमेद : मका पिकाचा फुले उमेद (क्युएमएच-1701) हा अधिक धान्य उत्पादन देणारा आणि मध्यम कालावधीत पक्व होणारा संकरीत वाण महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. 

4. मका-फुले चॅम्पीयन : मका पिकाचा फुले चॅम्पीयन (क्युएमएच-1819) हा अधिक उत्पादन देणारा, लवकर पक्व होणारा संकरीत वाण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. 

5. ऊस- फुले 13007 : फुले ऊस-13007 हा ऊस पिकाचा वाण राष्ट्रीय पातळीवर द्विपकल्पीय प्रदेशासाठी प्रसारित करण्यात आला आहे.  

प्रसारीत यंत्रे

1. उसाची पाने काढणे व कुट्टी करण्यासाठी ट्रॅक्टरचलीत फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्र प्रसारित करण्यात आले आहे. 

2. भुईमुग शेंगा फोडणे तसेच शेंगदाणे, फुटके शेंगदाणे, शेंगा आणि टरफले वेगवेगळे करण्यासाठी विद्युत मोटारचलीत फुले भुईमुग शेंगा फोडणी व वर्गवारी यंत्र प्रसारित करण्यात आले आहे. 

3. फळे आणि भाज्यांमधुन रस काढण्यासाठी फुले रस काढणी यंत्र छोट्या प्रक्रिया उद्योजकांसाठी प्रसारीत करण्यात आले आहे.