महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेळीपालनावरील एक दिवसीय महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेळीपालनावरील एक दिवसीय महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात शेळीपालनावरील एकदिवसीय महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न*

*राहुरी विद्यापीठ, दि. 3 नोव्हेंबर, 2023*

                  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अ.भा.स. संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत खास महिलांसाठी शाश्वत शेळीपालन तंत्र या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशिक्षण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे व संशोधन संचलनालयाचे उपसंचालक डॉ.बाळासाहेब पाटील उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. दिनकर कांबळे मार्गदर्शनात म्हणाले की, महिला शेतकर्यांनी विद्यापीठामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला शेळीपालन व्यवसाय शाश्वत करून जास्तीत जास्त नफा मिळवावा. शेळीपालन व्यवसाय म्हणून केल्यास त्यापासून शाश्वत उत्पादन शक्य आहे.

                   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. विष्णू नरवडे म्हणाले की, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली खास करून महिला शेळीपालकांना शाश्वत व व्यावसायिक शेळीपालनासंबधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असावी व नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सजगता निर्माण व्हावी ह्या हेतूने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. डॉ. महेंद्र मोटे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. रविंद्र निमसे व डॉ. बाळासाहेब पाटील इत्यादी शास्त्रज्ञांनी शास्त्रोक्त पद्धतीने पैदास, आहार व उपयुक्त झाडपाला, आरोग्य व्यवस्थापन तसेच शेळीच्या दुधाचे गुणधर्म यासंबधी सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींना निविष्ठा, प्रशिक्षण पुस्तिका व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमर लोखंडे यांनी केले. सदरच्या महिला प्रशिक्षणासाठी एकूण 25 महिला प्रशिक्षणार्थीनी भाग घेतला. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी श्री. संदीप पवार, श्री. गौरव घोलप, श्री. रमेश कल्हापुरे, श्री. अजय गुलदगड यांनी विशेष परिश्रम घेतले.