शेतीची शाश्वतता टिकविण्यासाठी शेतीमधील यांत्रिकीकरण गरजेचे - सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार .
*महात्मा फुले कृषी विद्यापीठात तिफन- 2023 कार्यक्रम संपन्न*
*शेतीची शाश्वतता टिकविण्यासाठी शेतीमधील यांत्रिकीकरण गरजेचे*
*सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार*
*राहुरी विद्यापीठ, दि. 4 जून, 2023*
दिवसेंदिवस भारतीय शेतीमधील प्रश्न व आव्हाने वाढत आहेत. त्यापैकी एक भागातील तरुण नोकरी धंद्यासाठी शहरात स्थलांतरित होत आहे. यामुळे शेतीमधील कुशल मनुष्यबळ कमी होत आहे. सन 1971 मध्ये शेतीमधील मनुष्यबळ 67% होते ते 2021 मध्ये 50% पर्यंत आले आहे, सन 2025 मध्ये ते 39% पर्यंत खाली येणार असल्याचे भाकित आहे. यामुळे शेतीतील मजुरांची कमतरता दिवसेंदिवस जाणवत चालली आहे. यावर पर्याय शोधण्यासाठी आपल्याला कमी खर्चातील यंत्रे, शाश्वत व किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करावी लागतील, जेणेकरून मशागती पासून, पीक काढणी व मूल्यवर्धनापर्यंत प्रक्रिया करणे सोपे होईल. यामुळे शेतकऱ्याला त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळेल आणि शेती फायद्याची होईल, याकरिता भविष्यामध्ये शेती टिकवायची असेल तर शेतीमधील यांत्रिकीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफन- 2023 या कृषी यंत्र विकसित करण्याच्या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी डॉ. दिलीप पवार बोलत होते. याप्रसंगी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे माजी वरिष्ठ उपसंचालक व प्रोफेसर डॉ. के.सी. होरा, जॉन डेरचे जनरल मॅनेजर श्री. आनंद राज, जॉन डीअर चे चीफ इंजिनियर श्री. दीपक भोईर,सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सचे इंडिया तिफन 2022 चे समन्वयक श्री. अमित बोरा, कृषी यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, कृषी यंत्रे व अवजारे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बाष्ठेवाड, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे सचिव श्री. महेश मासुरकर, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सचे इंडिया तिफन 2023 चे समन्वयक श्री संजय देसाई व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया तिफन 2023 चे सहसमन्वयक श्री. गणपती पुनगुणड्रन व्यासपीठावर उपस्थित होते.
तिफन- 2023 या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून डॉ. दिलीप पवार बोलत होते. यावेळी डॉ. के.सी. होरा आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की कृषी व्यवस्था ही देशाचा कणा आहे. शाश्वत कृषी व्यवसायासाठी यांत्रिकीकरणाची जोड हवी. पण हे यांत्रिकीकरण स्वस्त व गरजेनुसार असावे. तिफन ही स्पर्धा तुमच्यासाठी एक संधी आहे,ज्यामुळे तुमच्यातील आयडिया ही प्रत्यक्षात उतरून यातूनच भविष्यातील उद्योजक म्हणून तुम्हाला स्थान मिळू शकते.तुम्ही इथेच थांबू नका तुमची नवनिर्मिती पुढे घेऊन चला व यशस्वी उद्योजक व्हा. याप्रसंगी श्री. आनंद राज बोलताना म्हणाले की एक टेक्नॉलॉजिस्ट तसेच उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी या तिफन-2023 द्वारे तुम्ही टाकलेले पाऊल निश्चितच वाखाणण्यासारखे आहे. जगामध्ये आज यांत्रिकीकरण 30 टक्क्यांपर्यंत पोहोचलेले आहे. जीवनात अपयश हे कधीच नसते, असते फक्त शिकणे आणि यश मिळविणे. यशाकरता तुम्ही सदैव कार्यरत रहा असा सल्ला त्यांनी यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दिला. यावेळी तिफन-2022 चे समन्वयक श्री. अमित बोरा म्हणाले की अनुभवातून तसेच सुरुवातीला आलेल्या अपयशामधूनच नवीन संकल्पना जन्म घेते व पुढे भविष्यात काहीतरी नवीन जन्माला येते. या स्पर्धेमध्ये भाग घेणे हे पण एक यश मिळविण्यासारखेच आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सचे इंडिया तिफन 2023 चे समन्वयक श्री. संजय देसाई यांनी तिफन 2023 च्या प्रवासाविषयी माहिती दिली.
यावेळी या तिफन-2023 या स्पर्धेतील विविध पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रथम विजेता संघ ठरला पंजाब मधील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा संघ. यांना दीड लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पहिले उत्तेजनार्थ बक्षीस संभाजीनगर येथील छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघास रोख रुपये एक लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस 75 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह संभाजीनगर येथील देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयाच्या संघास देण्यात आले. यावेळी उत्कृष्ट इनोव्हेशन डिझाईन साठी कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, बेस्ट कॉस्ट साठी पुणे येथील राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेस्ट सेल्स अँड मार्केटिंग साठी संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयांच्या संघांना रोख 25 हजाराचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बेस्ट मेंटर म्हणून श्री. प्रवीण शर्मा आणि बेस्ट को मेंटर म्हणून श्री. भूषण पाटील यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर यावेळी या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून काम केलेल्या विविध कंपन्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी श्री. महेश मासुरकर यांनी पुढील वर्षी होणाऱ्या तिफन -2024 या स्पर्धेचे समन्वयक म्हणून जॉन डीअरचे मॅनेजर श्री. अजय अग्रवाल यांच्या नावाची घोषणा केली.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया टिफन- 2023 चे सहसमन्वयक श्री. गणपती पुनगुणड्रन यांनी केले. डॉ. नानासाहेब पवार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप राजपूत व शितल कोलते यांनी केले.