इंकलाब जिंदाबादच्या नाऱ्यात पहिले राज्य अधिवेशन संपन्न !
श्रीरामपूर :- क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेड संलग्न इंकलाबी नौजवान सभा (RYA) पहिले राज्य अधिवेशन श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे संपन्न झाले. इंकलाबी नौजवान सभेचे महासचिव कॉ. नीरज कुमार, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघांचे कॉ. उदय भट, लाल निशाण पक्षाचे सचिव मंडळ सदस्य कॉ. अतुल दिघे कॉ. बाळासाहेब सुरूडे, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. सतीश सर्वगुडे, कॉ. मदिना शेख, कॉ. मधुकर नरसिंगे, कॉ. शरद संसारे, कॉ.जीवन सुरूडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले राज्य अधिवेशन पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरातून बाईक रॅली काढण्यात आली होती. अधिवेशनाच्या सुरुवातीला मी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. आजच्या अधिवेशनात १७ जणांची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये माझी राज्य सरचिटणीसपदी आणि कॉ. सतीश सर्वगुडे यांची राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
येत्या २०२४ च्या निवडणुकीत युवकांच्या प्रश्नांवर न बोलणाऱ्या सरकारला विरोध करायचा, सन्मानजनक रोजगार मिळण्याची मागणी सर्वांची असली पाहिजे, जातीचे - धार्मिक द्वेषाचे राजकारण बंद करुन सन्मानाचे जगण्यासाठी लढा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. श्रीकृष्ण बडाख पाटील यांनी केले आणि आभार कॉ. शरद संसारे यांनी मानले.