श्रीरामपूरमध्ये कालवा परिसरातील रहिवाशांना नोटीस; 27 फेब्रुवारीपूर्वी घरे खाली करण्याचे आदेश
श्रीरामपूरमध्ये कालवा परिसरातील रहिवाशांना नोटीस; 27 फेब्रुवारीपूर्वी घरे खाली करण्याचे आदेश
प्रतिनिधि : प्रसाद घोगरे _ 9370328944
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरातील प्रवरा कालव्यालगत सुमारे 40 फूट अंतरावर गेल्या 40 ते 50 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सिंचन विभागाकडून घरे खाली करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, 1980 च्या सुमारास या परिसरात लोकवस्ती नव्हती. त्या काळात अनेक गरीब, दलित व बेघर कुटुंबांनी येथे लहान स्वरूपाची घरे उभी करून आपला संसार सुरू केला. पुढील काळात नगरपरिषदेकडून या घरांची नोंद करण्यात आली, मालमत्ता कर (पट्ट्या) आकारण्यात आला, तसेच नळ कनेक्शन, रस्ते व गटारीसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
मात्र अलीकडे सिंचन विभागाकडून संबंधित जागा कालव्याच्या हद्दीत येत असल्याचे नमूद करत रहिवाशांना 27 फेब्रुवारी 2026 पूर्वी घरे स्वखर्चाने खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
या निर्णयामुळे अनेक कुटुंबांसमोर बेघर होण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. “आम्ही चार-पाच दशकांपासून येथे राहत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कर आकारला गेला, मतदानही घेतले गेले. आता अचानक घरे सोडण्यास सांगितले जात आहे. आमचे पुनर्वसन न करता आम्हाला रस्त्यावर आणू नये,” अशी मागणी काही रहिवाशांनी केली.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले असून, योग्य तो तोडगा काढण्याची मागणी होत आहे. पुनर्वसनाची व्यवस्था करूनच कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची भूमिका आहे.
या प्रकरणात प्रशासनाची अधिकृत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असून, पुढील घडामोडींवर शहराचे लक्ष लागले आहे.








