महात्मा फुले कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञांशी संवाद कार्यक्रम संपन्न .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात शास्त्रज्ञांशी संवाद कार्यक्रम संपन्न*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे शास्त्रज्ञांबरोबर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के होते. या सत्रासाठी तज्ञ म्हणुन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शिक्षण नियोजन व गृह विज्ञान विभागाच्या सहाय्यक महासंचालिका डॉ. बिमलेश मान उपस्थित होत्या. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, हाळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील व नोडल अधिकारी डॉ. एम. आर. पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की विद्यापीठाने कमी मनुष्यबळामध्ये आत्तापर्यंत संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यामध्ये भरीव असे योगदान दिले असून यामुळे विद्यापीठाला ‘अ’ उत्कृष्ठ मानांकन मिळाले आहे. राहुरी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या प्रमुख आठ पिकांच्या वाणांचे आर्थिक विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले आहे की या आठ पिकांच्या वाणांमुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळमानाने एकूण रु. 2,40,188 कोटी व निव्वळ रु. 32,206 कोटी इतक्या महसुली उत्पन्नाची भर पडली आहे. यावेळी डॉ. बिमलेश मान मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की विकसीत भारत 2047 करीता देशाला जास्तीत जास्त कृषि पदवीधर व कृषि व्यवसायकांची गरज आहे. भारतीय शेती शाश्वत तसेच पर्यावरणपूरक होण्यासाठी नैसर्गिक शेतीची आवश्यकता आहे. यावेळी त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषद विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, विविध कौशल्य आधारीत कोर्स, एन.आर.एफ. मानांकन सुधारण्यासाठी करावयाच्या विविध बाबी तसेच नाहेपद्वारे सुरु केलेल्या डिजीटल लर्नींग, नविन होकेशनल कोर्सस, पदवीका कोर्सेस व द्विपदवी कार्यक्रमाबाबतच्या मार्गदर्शक सूचना या विषयी विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित विभाग प्रमुख, कृषि महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता यांनी विविध मुद्यांवर आपले प्रश्न मांडून चर्चेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एम.आर. पाटील यांनी या शास्त्रज्ञांबरोबरील संवादाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सुनील भणगे यांनी मानले. या संवादासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.