पत्रकारितेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी 'आम्ही नेवासकर न्यूज'चे नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन

पत्रकारितेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी 'आम्ही नेवासकर न्यूज'चे नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन

पत्रकारितेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी 'आम्ही नेवासकर न्यूज'चे नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन

 

नेवासा | प्रतिनिधी

 

भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे, तथ्याधारित वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाऊ नये तसेच कायद्याच्या चौकटीत निष्पक्ष कार्यवाही व्हावी, या मागण्यांसाठी 'आम्ही नेवासकर न्यूज'च्या वतीने गुरुवारी नेवासा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही नेवासकर न्यूज' हे स्थानिक डिजिटल वृत्तमाध्यम गेल्या अनेक वर्षांपासून नेवासा तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताचे विषय आणि शासकीय कामकाजातील त्रुटी वस्तुनिष्ठ व पुराव्यांच्या आधारे जनतेसमोर मांडत आहे.

 

अलीकडेच नेवासा नगरपंचायतीशी संबंधित कथित कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाबाबत उपलब्ध शासकीय कागदपत्रांमधील विसंगती अधोरेखित करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. हे वृत्त केवळ उपलब्ध अधिकृत कागदपत्रांच्या आधारे व जनहिताच्या दृष्टीने प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

दरम्यान, या वृत्तानंतर 'आम्ही नेवासकर न्यूज'विरोधात नेवासा पोलीस स्टेशन येथे अर्ज दाखल झाल्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे समोर आली. या पार्श्वभूमीवर पत्रकारितेचे कर्तव्य म्हणून तथ्याधारित वृत्तांकनाला गुन्हेगारी स्वरूप देणे किंवा माध्यमांवर दबाव निर्माण करणे हे लोकशाही मूल्यांसाठी घातक ठरू शकते, असे निवेदनात म्हटले आहे.

 

तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(1)(अ) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य त्याचाच अविभाज्य भाग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कोणत्याही तक्रारीवर कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित माध्यमाची बाजू ऐकून घेणे, उपलब्ध कागदपत्रांची निष्पक्ष पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पारदर्शकपणे राबविण्याची मागणीही करण्यात आली.

 

निवेदनाद्वारे कोणताही बाह्य दबाव न स्वीकारता निष्पक्ष चौकशी करावी, पत्रकारांवर अनावश्यक दबाव किंवा दडपशाही होऊ नये, कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी तसेच आवश्यक असल्यास पुराव्यांच्या आधारे कायदेशीर व निःपक्षपाती चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

 

या निवेदनाची प्रत तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, नेवासा मतदारसंघाचे आमदार, अहिल्यानगरचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे.

 

यावेळी पत्रकार संदीप गाडेकर, चंद्रकांत दरंदले, गणेश बेल्हेकर, मंगेश निकम, अभिषेक गाडेकर, गणेश चौगुले, नरेंद्र काळे, सचिन कुरुंद, सुमित पठारे, युनूस भाई पठाण, बन्सीभाऊ एडके, बादल परदेशी, राजेंद्र वाघमारे, आशिष कावरे, राजेंद्र कडू यांच्यासह नंदकुमार पाटील, ॲड. संजय सुखदान, ॲड. सादिक शिलेदार, सतीश पिंपळे, आसिफ भाई पठाण, लक्ष्मण जगताप, जालिंदर गवळी, अनिल शिंदे, नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे, नगरसेवक स्वप्नील मापारी, नगरसेवक राजेंद्र काळे, अरुण जाधव, माऊली तोडमल, अनिल पेचे, प्रशांत वाघ, प्रशांत डाके, ऋषिकेश गवळी, राहुल म्हस्के, दीपक धोत्रे, आकाश एरंडे, सुरेश राक्षे, जयवंत मापारी, सुनील जाधव तसेच पत्रकारितेवर विश्वास असलेले अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

चौकट:

"मी महाराष्ट्रातील सर्व डिजिटल माध्यमे, पोर्टल आणि यूट्यूब न्यूज चॅनेल्सना आवाहन करतो की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या या लढ्यात आमची साथ द्यावी. आज अधिकृत स्वतंत्र नोंदणीची व्यवस्था नसल्याचा आधार घेत डिजिटल माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर उद्या ही परिस्थिती कोणत्याही डिजिटल पत्रकारावर येऊ शकते. त्यामुळे हा केवळ 'आम्ही नेवासकर न्यूज'चा प्रश्न नसून, संपूर्ण डिजिटल पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.

याचबरोबर भारत सरकारला आमची नम्र विनंती आहे की, डिजिटल न्यूज पोर्टल आणि यूट्यूब न्यूज चॅनेल्ससाठी स्वतंत्र, पारदर्शक आणि सुलभ नोंदणी व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे प्रामाणिक, जबाबदारीने आणि जनहितासाठी कार्य करणाऱ्या डिजिटल माध्यमांना अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचेही संरक्षण होईल."

 

– सौरभ संजय मुनोत, आम्ही नेवासकर न्यूज