राहुरी कृषी विद्यापीठात बायोहॅप्पीनेस सेंटर सहनिर्मिती या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न .
*राहुरी कृषि विद्यापीठात बायोहॅप्पीनेस सेंटर सहनिर्मिती या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न*
*विद्यापीठाच्या फुले समृध्द गाव या संकल्पनेत बायोहॅप्पीनेस या संकल्पनेचा अंतर्भाव*
*- कुलगुरू डॉ विलास खर्चे*
डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांची बायोहॅप्पीनेस ही संकल्पना पृथ्वीचे कल्याण आणि लोकांची समृध्दी साध्य करण्यासाठी एक शाश्वत प्रणाली ठरणार आहे. राहुरी कृषि विद्यापीठाने दिलेल्या तंत्रज्ञान शिफारशी या जमीन व पाण्याचे आरोग्य, पीक तसेच मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. विद्यापीठाच्या फुले समृध्द गाव या संकल्पनेत बायोहॅप्पीनेस या संकल्पनेचा अंतर्भाव आहे. राहुरी कृषि विद्यापीठ हे राज्यातील पहिले कृषि विद्यापीठ आहे जेथे बायोहॅप्पीनेस केंद्र सुरु करण्यात आले असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कृषि विद्यापीठ व चेन्नई येथील एम. एस. स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय बायोहॅप्पीनेस केंद्र सहनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चेन्नई येथील एम. एस. स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठानच्या प्रमुख डॉ. सौम्या स्वामीनाथन ऑनलाइन उपस्थित होत्या. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रा मनी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. जी. भावे ऑनलाइन उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एम. एस. स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठानच्या वरिष्ठ फेलो डॉ. आर. व्ही. भवानी, प्रतिष्ठानचे जैवविविधता संचालक डॉ. इसराइल ऑलिव्हर किंग, प्रतिष्ठानचे कार्यक्रम समन्वयक श्री. महेश म्हस्के हे अतिथी वक्ते म्हणुन उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके व अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. विकास लोंढे, कुलसचिव श्री. राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक डॉ. सचिन नांदगुडे,विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की बायोहॅप्पीनेस संकल्पनेत जैवविविधतेचे संवर्धन व शाश्वत वापरातून मानवी आरोग्य, पोषण, उपजिवीका आणि पर्यावरण कल्याण साधणारे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकरी कल्याण आणि बायोहॅप्पीनेस इंडेक्स बनविण्यास मदत होइल. याप्रसंगी डॉ. सौम्या स्वामीनाथन आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की जमीन, पाणी व मानवी आरोग्य सुधारण्यासाठी तसेच पर्यावरणाचा शाश्वत विकास होण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने काम होणे आवश्यक आहे. प्रा. एम.एस. स्वामीनाथन यांनी मांडलेल्या बायोहॅप्पीनेस संकल्पनेत जैवविविधतेचे संवर्धन व शाश्वत वापरातून मानवी आरोग्य सुधारणा व सर्वांगीन पर्यावरण कल्याण साधणार आहे. शाश्वत विकासाची प्रगती आणि परिणामकारकता बायोहॅप्पीनेस निर्देशांकाच्या माध्यमातून मोजली जाईल. डॉ. आर. व्ही. भवानी आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की बायोहॅप्पीनेस ही संकल्पना शेतकर्यांशिवाय परिपूर्ण होणार नाही. महिला शेतकरी जर समाधानी असतील तरच बायोहॅप्पीनेस संकल्पना यशस्वी झाली असे म्हणावे लागेल. पर्यावरण, शेतकर्यांचे अर्थकारण व समानता या बायोहॅप्पीनेस करिता महत्त्वाच्या आहेत. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रा मणी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे व डॉ. प्रशांत बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. इसराइल ऑलिव्हर किंग यांनी संदर्भ सेटिंग व बायोहॅप्पीनेसचे मोजमाप यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. मृणाल अजोतीकर यांनी मानले. या कार्यशाळेसाठी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, इतर अधिकारी तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांमध्ये बायोहॅप्पीनेस सेंटर सुरु करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.








