आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. प्रभारी कुलगुरू डॉ.सत्ताप्पा खरबडे.

*राहुरी विद्यापीठ, दि. 24 फेब्रुवारी, 2025*
भविष्यातील जग हे अत्यंत स्पर्धात्मक असून कृत्रिम बुध्दिमत्ता यामध्ये महत्वाची भुमिका बजावणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संगणक तसेच कृत्रिम बुध्दिमत्ता या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याबरोबरच त्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी गरजेची असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये पालक दिन-2025 उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत डॉ. नानासाहेब पवार सभागृहात वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन झारखंड राज्यातील पोलिस उपमहानिरीक्षक श्री. मनोज चोथे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, काष्टी येथील कृषि विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र गाडगे, लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे, सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के, पारनेर तालुक्यातील सरपंच पंकज कारखीले, स्नेहसंमेलन सचिव दर्शना पाटील व विद्यार्थी परिषदेचे सभापती विशाल हराळ उपस्थित होते.
डॉ. साताप्पा खरबडे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यात भरीव असे योगदान दिले आहे. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करुन कृषि व औद्योगीक तसेच प्रशासकीय क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करुन विद्यापीठाचे नांव मोठे केले आहे. त्याच पध्दतीने सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भविष्यात आपल्या महाविद्यालयाचे नांव मोठे करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोज चोथे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की महाविद्यालयामधील आजचा दिवस म्हणजे भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाण्याचे निश्चित कराल त्यासाठी आपले प्रयत्न हे सतत व निरंतर ठेवा. इच्छा व दृढशक्ती असले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आज कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे कृषि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात खुप बदल होत आहेत. काळाबरोबर आपण ते बदल स्वीकारले तरच या स्पर्धेच्या युगात आपण टिकाव धरु शकू. यासाठी स्वतःमध्ये चांगले कौशल्य आत्मसात करुन प्रवाहाबरोबर चालणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा परंतू आपल्या जीवनात विनम्रपणा ठेवा, आपली नाळ नेहमी मातीशी जोडलेली ठेवली तरच खर्या अर्थाने तुम्ही जीवनात यशस्वी झालात असे म्हणता येईल. हसत राहा-आनंदी राहा असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
डॉ. रविंद्र बनसोड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की विद्यार्थ्यांनी नेहमी चौकटीच्या बाहेर जावून विचार केला पाहिजे. स्पर्धा परिक्षेव्यतिरीक्त अन्य क्षेत्रातही तुम्ही चमकदार कामगिरी करु शकता. त्यासाठी तुम्हाला नकारात्मक गोष्टी बाजुला सारुन नविन आव्हाणे स्विकारावी लागतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन नलावडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख विशाल हराळ याने करुन दिली.वार्षिक अहवालाचे वाचन दर्शना पाटील हिने केले. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील वैयक्तीक खेळाबरोबरच खो-खो, बास्केटबॉल, टेबल टेनीस, क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, फुटबॉल, एन.सी.सी., तिफण स्पर्धा याबरोबरच विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीके व प्रशस्तीपत्रे देवून गौरविण्यात आले. यामध्ये चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. कैलास कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करयासाठी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सचिन नलावडे, शारिरीक शिक्षण निदेशक वैभव बारटक्के तसेच महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.