शास्त्रज्ञांच्या पाठीवर कुलगुरूंची कौतुकाची थाप,स्वयंप्रेरित शास्त्रज्ञांनी केलेल्या कामामुळेच विद्यापीठाचे नाव मोठे होते - कुलगुरू डॉ . जी . पाटील
*शास्त्रज्ञांच्या पाठीवर कुलगुरुंची कौतुकाची थाप*
*स्वयंप्रेरीत शास्त्रज्ञांनी केलेल्या कामामुळेच विद्यापीठाचे नांव मोठे होते*
*- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*
*राहुरी विद्यापीठ, दि. 11 जून, 2024*
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने अकोला कृषि विद्यापीठात झालेल्या 52 व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये इतर तीनही कृषि विद्यापीठांपेक्षा जास्त वाण, कृषि यंत्रे व तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या. आजपर्यंत राहुरी कृषि विद्यापीठाने देशाच्या आणि राज्याच्या कृषि विकासात मोठे योगदान दिले आहे. ज्यावेळी आपण संशोधीत केलेले वाण शेतकर्यांच्या शेतावर जातो तेव्हा सर्वात जास्त समाधान, आनंद ते वाण तयार करणार्या शास्त्रज्ञाला होते. अशा स्वयंप्रेरीत शास्त्रज्ञांनी केलेल्या कामामुळेच विद्यापीठाचे नांव मोठे होते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
52 व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील ज्या शास्त्रज्ञांनी विविध पिके, भाजीपाला वाण, कृषि यंत्रे व 92 तंत्रज्ञान शिफारशी तयार करण्यासाठी योगदान दिले त्या शास्त्रज्ञांचा सत्कार कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर व नियंत्रक श्री. सदाशिव पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सुनील गोरंटीवार यांनी विद्यापीठाने 52 व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये सादर केलेल्या प्रस्तावाचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी या बैठकीची पार्श्वभुमी सांगुन संशोधन उपलब्धींचा आढावा घेतला. याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, डॉ. आनंद सोळंके, डॉ. बी.टी. पाटील, सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे व कृषि यंत्रे व अवजारे विभागाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपसंचालक संशोधन डॉ. बाळासाहेब पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, विभाग प्रमुख, कार्यक्षेत्रातील शास्त्रज्ञ, विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.