म.फु.राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विकसीत कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि अटारी, पुणे अंतर्गत विद्यापीठाच्या 10 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 17 कृषि विज्ञान केंद्राद्वारे दि. 29 मे ते 12 जून, 2025 या कालावधीत विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक कृषि विज्ञान केंद्र स्तरावर शास्त्रज्ञांचे दोन चमू तयार करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारे संचलित विविध संस्थेचे शास्त्रज्ञ तसेच प्रगतिशील शेतकरी यांचा समावेश असणार आहे. यामध्ये दररोज कृषि विज्ञान केंद्राद्वारे संचलित चमूद्वारे सहा गावांना भेट देण्यात येणार असून एकूण विद्यापीठांतर्गत 1530 गावांना भेटी देण्यात येणार आहेत. या विकसीत कृषि संकल्प अभियानात शेतकर्यांमध्ये जनजागृती केली जाणार असून कृषि क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानासह नव्या पीक वाणांची व योजनांची माहिती शेतकर्यांना दिली जाणार आहे. या माध्यमातून सात लाखाहून अधिक शेतकर्यांना त्याचा लाभ होणार आहे. केंद्रीय कृषि मंत्रालय आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्याद्वारे या अनोख्या उपक्रम विकसित कृषि संकल्प अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले आहे.