राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात ना.विखे यांच्या कडे तक्रार*
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरून मराठा एकीकरण समिती आक्रमक
राहूरी नगर परिषद हद्दीत जुनी पाण्याची टाकी निष्कासित केल्यानंतर त्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवावा अशी मागणी मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्यावतीने व नागरिकांच्या वतीने राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांना दि.२०.०८.२०२४ रोजी पत्र देवून करण्यात आली होती.परंतु मराठा संस्थेने दिलेल्या निवेदनाला तब्बल एक महिन्यांनतर राहुरी नगरपालिका प्रशासनाने जागे होत २०.०९.२०२४ रोजी पत्र देत राहुरी बाजार पेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकाना समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाठविल्याचे पत्रा द्वारे कळविले आहे.
वास्तविक पाहता राहुरी शहराजवळ शिर्डी व शिंगणापूर हे प्रसिध्द देवस्थान आहेत.देश- विदेशातून येणारे भाविक – पर्यटक हे राहुरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून प्रवास करत असतात,राहुरी शहरात कुठेही “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा अश्वारूढ पुतळा नाही.
राहुरी नगर परिषदेने सुधारित पाणीपुरवठा योजने अंतर्गत नवीन पाण्याची टाकी मुथ्था प्लॉट ,कॉलेज रोड मार्गावर बांधलेली आहे.नगर मनमाड रस्त्याच्या कडेला असलेली जुनी पाण्याची टाकी निष्कासित करण्यात येणार आहे.
जिल्हा नियोजन समिती अ`नगर यांच्या माध्यमातून अ`नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा पुतळा बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे . राहुरी शहरातील जुनी पाण्याच्या टाकी निष्कासित केल्यानंतर त्या मोकळ्या जागेत “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मराठा एकीकरण समितीचे सदस्य तथा नागरिक सत्यजित कदम,राजूभाऊ शेटे,देवेंद्र लांबे,सतिश घुले,नारायण धोंगडे,प्रशांत काळे,सनी डौले,प्रशांत मुसमाडे,वसंत कदम,सुनील विश्वासराव,संदीप कोठुळे,दिपक त्रिभुवन सदस्यांनी समक्ष भेट घेत केली आहे.
राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे हे मनमानी कारभार करत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हा जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेत बसवावा अशी असतांना रा.न.पा.चे मुख्याधिकारी श्री.ठोंबरे हे राहुरी शहरातील व तालुक्यातील नागरिक,व्यापारी व शिवशंभू प्रेमींची मागणीचा विचार न करता राहुरी शहरात मनमानी कारभार करत आहेत.
*चौकट – छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नगर मनमाड रस्त्यावरील जुनी पाण्याची टाकी येथील जागेत बसविण्याची मागणी जोर धरत असतांना रा.न.पा.चे मुख्याधिकारी श्री.ठोंबरे यांची भूमिका नवी पेठेतील व्यापारी संकुलन समोरील कमी क्षेत्र असलेल्या जागेत पुतळा उभारणीचा हट्ट का धरत आहेत ? यावर शंका निर्माण होत आहे.*