*कानडगाव येथे खेत बचाव अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न शेती शाश्वत होण्यासाठी एकत्र काम करूया.कुलगुरू डॉ.विलास खर्चे.*

*कानडगाव येथे खेत बचाव अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न शेती शाश्वत होण्यासाठी एकत्र काम करूया.कुलगुरू डॉ.विलास खर्चे.*

*राहुरी विद्यापीठ, दि. 27 जून, 2026*

 शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर संतुलीत खतांचा वापर आवश्यक आहे. शेतकरी अजुनही माती परिक्षण न करता रासायनीक खतांचा वापर करतात. पिकांना टाकलेले रासायनीक खत सर्वचीसर्व पिकांना उपलब्ध होत नाही. यासाठी जिवाणू खतांचा वापर होणे गरजेचे आहे. जमिनीची उत्पादकता, पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी जिवाणू खते, सेंद्रिय खते आणि हिरवळीचे खतांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी पीक विविधतेवर भर द्यावा. आपल्या शेतामध्ये भरडधान्य पिकांचा अंतर्भाव असावा. मानवी आरोग्य व शेती ही सांगड फार महत्वाची आहे. कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, शासनाचे विविध विभाग सदैव शेतकर्यांच्या बरोबर आहे. शेती शाश्वत होण्यासाठी आपण सर्व एकत्र येवून काम करुया असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.

 महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकृअप शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खेत बचाओ अभियान आणि संतुलीत खत वापर जागृकता अभियानांतर्गत एक दिवसीय बाजरी व नाचणी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कानडगावच्या सरपंच सौ. निशा गागरे, समाज कार्यकर्ते नानासाहेब गागरे, विभाग प्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, माती परीक्षण व पीक परिसाद प्रकल्पाचे मृदा रसायन शास्त्रज्ञ डॉ. आनंद जाधव, राहुरी तालुका कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे, ज्वारी कृषि विद्यावेत्ता डॉ. दत्तात्रय पाचारणे, फुले कृषि वाहिणीचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद चवई, प्रसारण केंद्र प्रमुख तथा शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सचिन सदाफळ, नाचणी व पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख व कनिष्ठ पैदासकार डॉ. योगेश बन व कृषि सखी सौ. सीमा गागरे उपस्थित होते.

 यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. प्रशांत बोडके म्हणाले की कृषि विद्यापीठाने पौष्टिक व अधिक उत्पादन देणारे वाण विकसीत केले आहे. यामध्ये बाचरीचे आदिशक्ती या वाणात लोहाचे प्रमाण जास्त आहे. शेतकर्यांनी बाजरी आणि नागलीची लागवड करुन घरात पौष्टिक धान्याचा आपल्या आहारत समावेश करावा. यामुळे चांगले उत्पादन मिळून आरोग्यही सुदृढ राहिल. अहिल्यानगर जिल्हा दुग्ध उत्पादनासाठी आग्रेसर असून नागली पीक घेतले तर धान्यासोबत जनावरांना पौष्टिक चारा देखील मिळणार आहे. शेतकर्यांनी विद्यापीठ उत्पादित वाण, जैविक, जिवाणू खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा व आपले उत्पादन वाढवावे. 

 याप्रसंगी सरपंच सौ. निशा गागरे म्हणाल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल आमच्या गावात शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे राबविल्याने शेतीमध्ये उत्पादन व उत्पन्नाची शाश्वती निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढले असून कडधान्य, तृणधान्य, फळपिके शास्त्रोक्त पध्दतीने होत असून पशुपालनामध्ये गाव आग्रेसर होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सचिन सदाफळ यांनी केले. यावेळी तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. आनंद जाधव यांनी रासायनिक खतांचा संतुलित व कार्यक्षम वापर आणि जैविक, जिवाणू आणि हिरवळीच्या खतांचा वापर, डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी बाजरी उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. योगेश बन यांनी नाचणी-पौष्टिक महत्व व सुधारीत लागवड तंत्रज्ञान व बापुसाहेब शिंदे यांनी कृषि विभागाच्या योजना या विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी नागली उत्पादक कुणाल पवार व भास्कर पंडित यांनी आपले नागली उत्पादनाचे अनुभव शेतकर्यांना सांगितले.

 यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेत बचाव अभियान आणि संतुलीत खत वापर जागृकता अभियान-2026 या माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बाजरी व नागलीचे बियाणे व माहितीपत्रक शेतकर्यांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी पौष्टिक भरडधान्याचे प्रदर्शन शेतकर्यांसाठी मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले तर आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले. कार्यक्रमाला कानडगाव येथील मधुकर गागरे, राधाकृष्ण गागरे, हैशीराम गागरे, ज्ञानेश्वर गागरे, कृषि सखी कु. जयश्री गागरे तांभेरे येथील ॠत्वीक गागरे, महेश गागरे, जालिंदर मुसमाडे, मंडळ कृषि अधिकरी भारत कातोरे, बाळासाहेब सोनवणे व सहाय्यक कृषि अधिकारी प्रभात आंत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेतकरी प्रथम प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे, प्रक्षेत्र सहाय्यक किरण मगर व राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तांभेरे व कानडगावातील 150 हुन अधिक शेतकरी उपस्थित होते.