महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषि अर्थशास्त्र विभागाच्या रौप्य महोत्सवी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषि अर्थशास्त्र विभागाच्या रौप्य महोत्सवी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात कृषि अर्थशास्त्र विभागाच्या रौप्य महोत्सवी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

*शेतीच्या शाश्वत विकासाकरीता नाविन्यपूर्ण उपाययोजनांची गरज**- प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे*

                महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उद्दिष्ट्ये, संशोधन आणि क्षेत्रस्तरीय अंमलबजावणीमधील अंतर भरुन काढण्याचे मार्ग शोधणे, मुल्यवर्धनास तसेच कृषि उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि हवामान स्मार्ट कृषि पध्दती विकसीत करणे हा आहे. येथे होणार्या चर्चेचा फायदा शेतकर्यांनाच नव्हे तर कृषि क्षेत्रासाठी चांगली धोरणे तयार करणार्यांनाही होईल. या परिषदेमध्ये कृषि व्यवसाय आणि उद्योजकता विकास, नाविन्यपूर्ण विपणन धोरण, मूल्यवर्धन आणि कृषि प्रक्रिया, हवामान स्मार्ट शेती, कृषि तंत्रज्ञान आणि डिजिटल शेती या विषयावर चर्चा होऊन शेतीच्या शाश्वत विकासाकरीता नाविन्यपूर्ण उपाययोजनांची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.

             महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि अर्थशास्त्र विभाग व अकोला येथील महाराष्ट्र सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चर इकोनॉमिक्स यांचे संयुक्त विद्यमाने 25 व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचा विषय ग्रामीण समृद्धीसाठी नाविन्यपूर्ण संशोधन व उद्योजकता ः कृषि दृष्टिकोन हा आहे. या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषि मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय पॉल शर्मा उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याच्या कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, महाराष्ट्र सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चर इकोनॉमिक्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. साळे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. आर. जी. देशमुख, अकोला येथील सोसायटीचे कोषाध्यक्ष डॉ. एस.सी. नागपूरे, विविध कृषि विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कदम, डॉ. माने, डॉ. मोरे, डॉ. तोरणे, कृषिभुषण सुरसिंग पवार व आयोजन समितीचे सचिव डॉ. रोहित निरगुडे उपस्थित होते.

               यावेळी डॉ. विजय पॉल शर्मा मार्गदर्शन करताना म्हणाले की शेतकर्यांना उच्च प्रतीचे बियाणे वेळेवर व कमी किमतीत उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याने पिकविलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी व चांगला भाव मिळण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शीतगृहांची उपलब्धता, रस्त्यांचे जाळे आणि ग्रेडिंग व प्रोसेसिंग युनिटची उपलब्धता असणे नितांत आवश्यक आहे. खाद्यतेल व डाळी यांच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर होण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना राबविलेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये भारताचा विविध कृषि उत्पादनांच्या यादीमध्ये प्रमुख सहभाग आहे. ज्या पिकांमुळे शेतकर्याला जास्त दर मिळेल अशी पिके घेण्यासाठी शेतकर्यांना प्रवृत्त करावे लागणार आहे. भारताने कडधान्यांच्या उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली आहे. या दोन दिवसीय परिषदेमध्ये शास्त्रज्ञांनी शेतकरीभिमुख शिफारशी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाशा पटेल आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की भारतीय शेती क्षेत्रात होऊ घातलेल्या हवामान बदलास तोंड देण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा अविष्कार करणे गरजेचे आहे. तसेच कृषि शास्त्रज्ञांनी याविषयी अधिकाधिक संशोधन करणे व ते शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. डी.एल. साळे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की या परिसंवादामध्ये भविष्यातील शेती मजबुत करण्याच्या दृष्टीने तसेच शेतकर्यांच्या शाश्वततेसाठी सहभागी संशोधकांनी प्रयत्न करावेत. आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिले यांनी सांगितले की भारतीय शेतीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इष्टतम संसाधन, व्यवस्थापन, मुल्यसाखळी विकास आणि ग्रामिण समृध्दीसाठी पुराव्यावर आधारीत धोरण तयार करण्यास मदत करण्यासाठी या परिसंवादातून निघणार्या शिफारशी संकलीत करुन महाराष्ट्र शासनाला सादर केल्या जातील. याप्रसंगी कृषि अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव कासार व अकोला कृषि विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. डी.एल. साळे यांना जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी कृषि अर्थशास्त्र विभागाने तयार केलेली स्मरणीका व थेसीस कॉम्पीडीयम या पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या दोन दिवसीय परिसंवादामध्ये विविध विषयांवर सादरीकरण होणार असून संशोधक आपले संशोधनपर लेख सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोहित निरगुडे व विद्यार्थीनी श्रावणी हिने तर आभार उप संशोधन सचांलक डॉ. पी.एन. शेंडगे यांनी मानले. या दोन दिवसीय परिसंवादासाठी देशभरातील कृषि विद्यापीठे आणि इतर प्रमुख संस्थांमधून सुमारे 600 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत.