मधमाशी हा शेतकऱ्यांचा खरा मित्र - संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के

*मधमाशी हा शेतकर्यांचा खरा मित्र**संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के*
विविध पिकातील परागीभवनामध्ये मधमाशांची भूमिका ही महत्वाची आहे. परदेशात झालेल्या संशोधनानुसार एका एकरात मधमाशांच्या दोन पेट्या ठेवल्या तर त्या क्षेत्रातील धान्य उत्पादनात 50 ते 60 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मधमाशांमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढून शेतकर्यांचा आर्थिक फायदा होतो. यामुळे मधमाशा या शेतकर्यांचा खरा मित्र असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठाचा कृषि किटकशास्त्र विभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मधमाशीपालन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान 2024-25 अंतर्गत दि. 17 ते 23 मार्च, 2025 या कालावधीत शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि किटकशास्त्र विभागातील परिसंवाद कक्षात झालेल्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, अहिल्यानगर येथील कृषि उपसंचालक सागर गायकवाड, नाशिक येथील सुकृती मधूशालेचे संचालक डॉ. तुकाराम निकम व राहुरीचे तालुका कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. विठ्ठल शिर्के पुढे म्हणाले की मधमाशांचे जीवन आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. मधमाशा या सतत कार्यमग्न राहुन आपले काम चोखपणे करत असतात. अशाच प्रकारे सर्व शेतकरी बंधुंनी एकमेकांना सहाय्य करुन शेतीत उत्कर्ष साधावा. शेतीचे खरे मुळ हे सहजीवनात आहे. मार्गदर्शन करतांना डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की मधमाशा या निसर्गचक्रातील महत्वाचा घटक आहे. मधमाशांद्वारे संपूर्ण निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्वाचे काम होते. विविध प्रकारच्या महत्वाच्या वनस्पतींचे अस्तित्व या मधमाशांवर अवलंबून आहे. शेतीमधील युवकांना शेतीपूरक उद्योग उभारण्यासाठी मधुमक्षिकापालन हा चांगला पर्याय ठरु शकतो असे यावेळी ते म्हणाले. डॉ. तुकाराम निकम आपल्या मनोगतात म्हणाले की मधमाशी म्हणजे शेतकरी तसेच शेतीचा आत्मा होय. मधमाशी म्हणजे समृध्दी. जलसिंचनाएवढेच परागसिंचन महत्वाचे आहे. हरित क्रांतीनंतर आता मधुक्रांती होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सागर गायकवाड यावेळी म्हणाले की सध्या फळबागांखाली क्षेत्र वाढत आहे. या फळबागांमधून जास्तीचे उत्पादन मिळावे व त्यात सातत्य राहावे यासाठी मधुमक्षिकापालन महत्वाचे ठरणार आहे. त्यांनी यावेळी उपस्थित शेतकर्यांना या शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उत्तम कदम यांनी केले. यावेळी डॉ. तुकाराम निकम यांनी तयार केलेल्या मधुप्रतिज्ञेचे वाचन डॉ. नंदकुमार भुते यांनी करुन उपस्थितांना मधुप्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन डॉ. नंदकुमार भुते यांनी तर आभार डॉ. पल्लवी पाळंदे यांनी मानले. यावेळी राहुरी मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे, वांबोरीचे मंडळ कृषि अधिकारी रामहरी मिसाळ, ब्राम्हणीचे कृषि सहाय्यक शुभम कदम, किटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी सात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत.