पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन' योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुभारंभ
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याहस्ते अनाथ बालकांना योजनेच्या लाभपत्रांचे वाटप
योजनेत जिल्ह्यातील मुला-मुलींचा समावेश
अनाथ बालकांना शासनाचा आधार
अहमदनगर, दि. 30:- #पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोव्हिड-19 मुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींसाठी ‘#पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन’ या योजनेचा तसेच 1 ते 12 वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचा नवी दिल्ली येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अनाथ बालकांच्या आई-वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही परंतु, आई-वडिलांच्या अपरोक्ष देश आणि देशातील जनता तुमच्यासोबत आहे असे सांगितले. ‘पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेसह मुलांना भावनात्मक सहयोग आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यामुळे विशेष संवाद सेवासुद्धा देण्यात येणार असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. केंद्रिय महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी यावेळी योजनेची माहिती दिली.
या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कोविड-19 मुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या अनाथ झालेल्या मुला-मुलींना आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी #डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते योजनेची लाभ पत्रे देण्यात आली. यामध्ये गायत्री शिवाजी बेारुडे, कोकणगांव, आदेश ज्ञानेश्वर यादव, संगमनेर, विशाल विरेन काळे, श्रीगोंदा, ऋतुराज दत्तात्रेय गायकवाड, श्रीगोंदा, सौरभ राजू नरवडे, अहमदनगर, कृष्णा नामदेव चव्हाण,चांभुर्डी, साक्षी एकनाथ अंबेकर, वडगांव गुप्ता, शिवम किशोर कलापूरे, खडाबे खुर्द, सबुरी मोहन गायकवाड, सावळी विहीर यांना योजनेतील त्यांच्या सहभागाची कागदपत्रे देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी बी.बी.वरुडकर, परिविक्षा अधिकारी श्रीमती एस.ए.राशीनकर, अनाथ मुलांचे नातेवाईक उपस्थित होते.
*योजनेची प्रमुख वैशिष्टये-*
कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना 18 वर्षे वयापर्यंत स्टायपेंड. या अंतर्गत, मुले 23 वर्षांची झाल्यावर पीएम केअर्स फंडातून 10 लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार. केंद्र सरकारकडून या मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल. या अंतर्गत, मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळेल, ज्याचे व्याज पीएम केअर्स फंडातून दिले जाईल. या मुलांना आयुषमान भारत योजनेअंतर्गत 18 वर्षांपर्यंत 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळेल. विमा प्रीमियम पीएम केअर्स फंडातून भरला जाईल. दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना जवळच्या मध्यवर्ती शाळा किंवा खाजगी शाळेत प्रवेश दिला जाईल. 11 ते 18 वयोगटातील मुलांना सैनिक शाळा आणि नवोदय विद्यालय यासारख्या केंद्र सरकारच्या कोणत्याही निवासी शाळेत प्रवेश दिला जाईल. जर मुले त्याच्या पालक किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यासह राहत असेल तर त्याला जवळच्या केंद्रीय विद्यालय किंवा खाजगी शाळेत प्रवेश मिळेल. जर मुलाला खाजगी शाळेत दाखल केले असेल तर शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत त्याची फी पीएम केअर फंडातून दिली जाईल आणि त्याच्या शाळेचा गणवेश, पुस्तके आणि प्रतीचा खर्चही दिला जाईल ..