खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा सकल मराठा समाज तीव्र आंदेलन करणार.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण मिळावे म्हणून टाकळीभान येथे झालेल्या रास्तारोकोनंतर सकल मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याने संतप्त झालेल्या श्रीरामपूर शहर व तालुक्यातील समाज बांधव व वरील संघाने उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांना निवेदन देत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगसोयरे अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करावे या मागणीसाठी मागील आठवड्यात सकल मराठा समाजाने टाकळीभान येथे रास्तारोको केला होता. हा रास्तारोको करताना पोलीस स्टेशन, महसुल प्रशासन यांची रितसर परवानगी घेण्यात आली होती. परवानगी घेतल्यानंतर सदर रास्तारोको करण्याता आला होता. त्यावेळी १४४ कलम लागू असल्याबाबत कोणतीही पुर्वसुचना किंवा तशी नोटीस आंदोलकांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आक्रमक होत प्रशासकीय भवन येथे उपविभागीय अधिका-यांची भेट घेत निवेदन दिले.
सकल मराठा समाज शांततेने स्वतःच्या न्यायहक्कसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे. लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेले ५८ मोर्चे, अनेक आंदोलने, हक्काची आरक्षण लढाई लढताना कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आताही झालेल्या रास्तारोको मध्येही प्रशासकीय अधिका-यांना हवे असलेले सहकार्य मराठा समाज बांधवांनी केले. तरीही चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेले गुन्हे मागे न घेतल्यास सकल मराठा समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचे समाज बांधवांनी जाहीर केले.