संविधान व लोकशाही विरोधी विशेष जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी श्रमिक महासंघाचे प्रांत कार्यालय श्रीरामपूर येथे जोरदार निदर्शन .

संविधान व लोकशाही विरोधी विशेष जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी श्रमिक महासंघाचे प्रांत कार्यालय श्रीरामपूर येथे जोरदार निदर्शन .

             श्रीरामपूर- व्यक्ती व आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्याच्या नावाखाली प्रस्तावित असलेले महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 मध्ये दिलेल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारे असल्याने ते ताबडतोब रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ संलग्न एक्टू च्या नेतृत्वाखाली प्रशासकीय भवन येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी नगरपालिका कामगार, अंगणवाडी कर्मचारी, शेतकरी-शेतमजूर यांच्यासह मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. यावेळी नायब तहसीलदार हेमलता वाकडे यांनी निवेदन स्वीकारले. 

         यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की,सदरचे विधेयक हे बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना यांच्या अत्यंत अस्पष्ट ढोबळ व्याख्या वापरून व्यक्ती व संघटनांवर कठीण निर्बंध  आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी आहे आणि प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी विधेयकाचा गैरवापर सरकार करण्याची शक्यता आहे.तसेच विधेयकाचा गैरवापर करून स्वतंत्र पत्रकार व माध्यम संस्था यांनाही लक्ष केले जाणार आहे. या विधेयकामुळे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष व संघटना, सामाजिक संघटना आणि निमसरकारी संघटना यांच्या संविधानिक आंदोलनावर निर्बंध येऊन जनतेच्या न्याय मागण्यांना शासनासमोर मांडण्याच्या प्रक्रियेवर अनेक बंधने व मर्यादा या विधेयकामुळे  येणार आहे.

    त्यामुळे नागरी हक्क, लोकशाही मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे हे जनसुरक्षा विधेयक ताबडतोब रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत ताबडतोब निर्णय न घेतल्यास मुबंईसह राज्यभर तीव्र स्वरूपाचेचक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

          यावेळी श्रमिक महासंघांचे राज्यध्यक्ष कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. मदिना शेख,कॉ. शरद संसारे, कॉ. जीवन सुरुडे,रतन गोरे आदीची भाषणे झाली.

      आंदोलन यशस्वी करणेकामी उत्तम माळी, राहुल दाभाडे, अरुण बर्डे, अस्लम शेख, आकाश शिंदे,बाबुलाल पठाण,संदीप शिंदे,विजय शेळके,सुभान पटेल,भीमराज पठारे,माया जाजू,तारा बर्डे, विमल गायकवाड, शकुंतला बिलावरे, शोभा विसपुते,दीपक शेळके,वर्षा देशमुख, अनिता गवळी,सुमन वाघमारे,शितल गोरे, दीपाली रणदिवे आदिसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.