हा पोल ठरतोय शाळेसाठी धोक्याची घंटा, कोणीच दखल घेत नसल्याने विद्यार्थी नाराज .
राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गेटच्या अगदी मधोमध असणारा इलेक्ट्रिक पोल हा शाळेसाठी धोक्याची घंटा बनून उभा असल्याचे चित्र सध्या दिसत आहे . हा पोल दुसऱ्या जागी हलविण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी महावितरणला अर्जाद्वारे कळविले होते परंतू याची काळजीपूर्वक दखल घेतली नसल्याचे येथिल शिक्षकांनी सांगितले आहे .
सध्या शाळेमध्ये खोलिचे बांधकाम चालू आहे . या बांधकामासाठी येणारे साहित्य व मोठी वाहने या पोलमुळे शाळेमध्ये घेऊन जाता येत नाही . ते साहित्य शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे .
पावसाळ्यामध्ये विद्युत सप्लाय हा या पोलमध्ये व जमिनीवर उतरत असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना जाण्या - येण्यासाठी एवढा एकच पर्याय असल्याने पावसाळ्यात जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे . एखाद्या विद्यार्थ्याचा हात चूकून या पोलला लागला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे . त्यामुळे तात्काळ दखल घेऊन शाळेला या पोलरूपी संकटातून सोडवा अशी मागणी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून होत आहे .