महसुल अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे; मापारी यांचा २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा..

महसुल अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे; मापारी यांचा २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा..

महसुल अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे; मापारी यांचा २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा..

श्रीरामपूर (अहिल्यानगर) | प्रतिनिधी : प्रसाद घोगरे - ९३७०३२८९४४.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील जमिनीच्या नोंदीत महसुल विभागाकडून झालेल्या कथित चुकीमुळे एका सामान्य नागरिकावर गंभीर आर्थिक व मानसिक संकट ओढावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अशोकनगर, श्रीरामपूर येथील रहिवासी व ड्रायव्हर व्यवसाय करणारे संजय नारायण मापारी (वय 50) यांनी 26 जानेवारी 2026 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

संजय मापारी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी गट नं. 175/2 मधील 8 गुंठे जागा खरेदी केली होती. व्यवहार पूर्ण करताना काही आर्थिक अडचणीमुळे त्यांनी त्यातील 2 गुंठे जागा परत विक्रीद्वारे दिली. मात्र, निपाणी वडगाव येथील तलाठी कार्यालयाकडून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने फेरफार नोंदी करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या चुकीच्या नोंदीमुळे 2 गुंठ्यांचा फेरफार मंजूर झाला, मात्र मूळ 8 गुंठ्यांच्या नोंदीला तुकडेबंदी कायद्याचे कारण देत नामंजूर करण्यात आले. परिणामी, त्यांच्या नावावरील संपूर्ण क्षेत्रच नोंदवहीतून नाहीसे झाले असल्याचे मापारी यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात तलाठी श्रीमती तेजल सोनवणे यांनी आर्थिक फायद्यासाठी चुकीची नोंद केल्याचा आरोप करत मापारी यांनी प्रांताधिकारी कार्यालयात अपील केले. मात्र, प्रांताधिकारी यांनी मंडलाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत दिलासा न दिल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचे त्यांनी सांगितले.

जमीन खरेदीसाठी नातेवाईकांकडून पैसे घेतले असून, 7/12 उताऱ्यावर कर्ज काढून ते फेडण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, नोंदीच न झाल्याने आर्थिक संकट गडद झाले असून घरगुती वादही वाढल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

“जर 26 जानेवारी 2026 पर्यंत चुकीच्या नोंदी रद्द करून दस्त क्रमांक 4943/2023 व 4954/2023 प्रमाणे फेरनोंदी करण्यात आल्या नाहीत, तर मी टोकाचे पाऊल उचलण्यास मजबूर होईन. याला संपूर्ण महसुल विभाग जबाबदार राहील,” असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

या घटनेमुळे महसुल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.