अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा..
अहमदनगर : आरोपी नामे राहुल अशोक गायकवाड, वय ३२ वर्षे, रा. हत्तलखिंडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ८ व १२ या अन्वये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ नुसार १ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रु.५०००/- दंड न भरल्यास दोन महिने साथी कैद अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सुरुवातीला अतिरिक्त सरकारी वकील श्री. मंगेश दिवाणे यांनी पाहिले. तद्नंतर सदरचे प्रकरण पोक्सो विशेष न्यायालय येथे वर्ग झाल्यानंतर सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.
सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की,
फिर्यादीचा चुलत भाउ आरोपी राहुल अशोक गायकवाड हा फिर्यादीचे घरामध्ये आला त्यावेळी फिर्यादी याची मुलगी वय वर्षे १५ घरामध्ये कॉटवर बसून टि.व्ही. पाहत असताना ती अभ्यासाकरीता वहया कॉटखालून घेत असताना आरोपीने पिडीत मुलीचा हात धरून तिला खाली पाडले व तिच्या ओठांचे चुंबन घेवून चावा घेतला. सदर कृत्यामुळे पिडीत मुलगी हीस लज्जा उत्पन्न झाली होती. या घटनेनंतर फिर्यादीने पारनेर पोलिस स्टेशन येथे दिनांक ०८/११/२०२३ रोजी आरोपी राहुल गायकवाड याचे विरूध्द भा.द.वि. कलम ३५४ व पोक्सो कायदा कलम ८ व १२ नुसार फिर्याद दिलेली होती. सदर घटनेचा तपास स.पो.नि. प्रमोद वाघ यांनी करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी तसेच पिडीत मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात पारनेर नगरपंचायतचे माहितगार इसम यांची साक्ष नोंदविण्यात आली. या केसची सुनावणी चालु असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, आरोपी हा पिडीत मुलीचा नात्याने चुलत काका लागतो. समाजामध्ये आजची परिस्थिती पाहता लहानग्या कोवळया मुलींवर तिच्या राहत्या घरांमध्येच अत्याचार होतो. मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ १५ वर्षांची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांचे मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वय वर्षे १५ असलेली अज्ञान मुलगी ही आरोपी विरूध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज सुरुवातीला अतिरिक्त सरकारी वकील श्री. मंगेश दिवाणे यांनी पाहिले. तद्नंतर सदरचे प्रकरण पोक्सो विशेष न्यायालय येथे वर्ग झाल्यानंतर सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंदे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो. कॉ. अडसुळ, तसेच स. फौ. शिवनाथ बडे यांनी सहकार्य केले.