महत्मा फुले कृषि विद्यापीठात पैदासकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन .

महत्मा फुले कृषि विद्यापीठात पैदासकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात पैदासकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन*

*राहुरी विद्यापीठ, दि. 7 ऑक्टोबर, 2024*

             महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पात पैदासकार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठात विविध पिकांवर संशोधन केले जाते त्यामध्ये पीक पैदासकारांचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे असते. त्या अनुषंगाने विविध पिकांवर काम करण्यार्या शास्त्रज्ञांमध्ये चर्चा घडून यावी, सर्वांनाच अनोळखी असलेले ज्यूट व त्या गटातील इतर पिके यांबद्दल माहिती मिळावी आणि सेवानिवृत्त शास्त्रज्ञ तसेच अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभावे या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मीलेट रिसर्च, हैद्राबादचे माजी संचालक डॉ. जे.व्ही. पाटील, कृषि वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विजू अमोलिक व वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते.

              यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. सुनील गोरंटीवार यांनी हायपर स्प्रेक्ट्रल इमेजिंग इन प्लांट ब्रीडिंग या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. जे.व्ही. पाटील यांनी पीक पैदास पद्धती व त्यांचा वापर कसा करावा, संशोधनाची दिशा काय/कशी असावी व शेतकरी वर्गाला फायदेशीर ठरेल असे संशोधन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन तीन टप्प्यांत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला ज्यूट, अंबाडी, भुईमूग व कापूस या पिकांच्या प्रक्षेत्र भेटीचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या सामूहिक चर्चासत्रात सहभागी शास्त्रज्ञांनी आपली मते मांडली, मनोगत व्यक्त केले तसेच मार्गदर्शन केले व कापूस तसेच इतर पिकांच्या संशोधनात्मक विशेष बाबी दर्शविण्यात आल्या.

               हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पवन कुलवाल, तसेच कापूस सुधार प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रातील पीक पैदासकार तसेच कृषि वनस्पतीशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ, त्याचबरोबर विद्यापीठातील निवृत्त पीक पैदासकार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.