*महात्मा फुले कृषि विद्यापीठात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*देशाच्या कृषि क्षेत्रातील उज्वल भविष्यासाठी कृषि विद्यापीठ कटिबध्द*
*-कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*
*राहुरी विद्यापीठ, दि. 26 जानेवारी, 2022*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन, शासनाच्या योजना, कृषि पदवीधर विद्यार्थी व प्रगतशील शेतकरी यांच्यामुळे कृषि क्षेत्रातील उत्पादन आणि उत्पन्नात अमुलाग्र बदल झाला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने आतापर्यंत शैक्षणिक, संशोधन व विस्तार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. यावर्षी विद्यापीठातील 18 विद्यार्थी जे.आर.एफ., 9 विद्यार्थी एस.आर.एफ. शिष्यवृत्ती आणि 131 विद्यार्थी नेट परिक्षा उत्तीर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कृषि महाविद्यालय, पुणे, धुळे, कोल्हापूर आणि राहुरी येथे संकल्प केंद्र सुरु करणार आहोत. यावर्षी विद्यापीठाने सहा वाण, चार अवजारे व 70 कृषि तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्यांसाठी प्रसारित केल्या आहे. बिजोत्पादनाची साखळी अधिक बळकट होण्यासाठी विद्यापीठाने 1200 हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महाबीज, खाजगी कंपन्या यांच्याबरोबर सामंजस्य करार केला. देशात प्रथमच या विद्यापीठाला ड्रोन रीमोट पायलट प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळली. विद्यापीठाच्या दृष्टीकोनातून ही एक मोठी उपलब्धी आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये मोठे संशोधन केलेले आहे. माझा एक दिवस बळीराजासाठी, मफुकृवि आयडॉल्स असे नाविन्यपूर्ण विस्तार उपक्रम विद्यापीठात राबविले जात आहे. विद्यापीठाचे प्रशासन आता गतिमान आणि पारदर्शक झालेले आहे. लवकरच आपण शासनाने दिलेल्या नियमानुसार भरतीप्रक्रिया राबविणार आहोत. विद्यापीठ सदैव प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभे आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मफुकृवि कॅलेंडर 2023 चे विमोचन करण्यात आले.
भारताचे संविधान प्रास्ताविकाचे वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला संचालक संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, नियंत्रक श्री. विजय पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. बापुसाहेब भाकरे, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. गोरक्ष ससाणे, प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके, एन.सी.सी. अधिकारी डॉ. सुनिल फुलसावंगे, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे यांनी केले. यावेळी एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी डॉ. फुलसावंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले व मानवंदना दिली.