*कृषि विद्यापीठाने केली शुगर फ्री कुकिज्स आणि बिस्कीट्सची निर्मिती*
*राहुरी विद्यापीठ, दि. 26 जानेवारी, 2023*
देशाच्या 74 वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाने फुले शुगर फ्री बिस्कीट्स, फुले शुगरलेस बिस्कीट्स, फुले शुगर फ्री कुकिज, फुले शुगरलेस कुकिज या प्रदार्थांची कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते लॉचिंग केली. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाने पौष्टिक व आयुर्वेदिक खाद्य पदार्थांची शास्त्रशुध्द पध्दतीने निर्मिती केली आहे. याआधी या विभागाने विकसीत केलेल्या फुले नानकटाई कुकीज/बिस्किटांना जागतिक बौध्दिक संपदा प्रमाणपत्र (पेटंट) प्राप्त झालेले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त हा एक पौष्टिक उपक्रम विद्यापीठ राबवित आहे.
यावेळी अधिष्ठाता (कृषि) आणि अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण म्हणाले या विभागांतर्गत आत्तापर्यंत भाजीपाला प्रक्रियामध्ये 36 व बेकरी व्यवसाय तंत्रज्ञानमध्ये 24 एक महिना कालावधीचे प्रशिक्षण वर्ग राबविले आहे. यामध्ये 976 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवून त्यांच्यापैकी 30 प्रशिक्षणार्थीनी स्वतःचा फळे व भाजीपाला प्रक्रिया व्यवसाय सुरु केलेला आहे. तसेच 15 प्रशिक्षणार्थीनी स्वत:चा बेकरी व्यवसाय सुरु करुन इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. या विभागांतर्गत याआधी आयुर्वेदिक कुकीजमध्ये फुले शतावरी कुकीज, फुले अश्वगंधा कुकीज, फुले पुदिना कुकीज, फुले बेहडा कुकीज आणि फुले आवळा कुकीज लाँचींग (प्रसारण) विक्रीसाठी केलेले आहे. याशिवाय विद्यापीठाच्या बेकरी युनिटमध्ये संशोधनात्मक व प्रायोगिक तत्वावर फुले ज्योती मिल्क ब्रेड, फुले स्वीट बन्स, फुले मिल्क टोस्ट, फुले सुरती/जिरा बटर, फुले नाचणी बिस्कीटस् आणि फुले नानकटाई कुकीज/बिस्कीट यांची सुध्दा निर्मिती केली जाते.
याप्रसंगी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, संचालक संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. गोरक्ष ससाणे, विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, डॉ. चिदानंद पाटील, माजी विभाग प्रमुख डॉ. सुभाषचंद्र शिंदे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी अन्नशास्त्र तंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञ, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या सत्कार करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थीनी कु. प्रतिक्षा शिंदे हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार कु. प्रतिक्षा हुलगुंडे यांनी मानले.