' ५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा '
अहमदनगर : आरोपी नामे रविंद्र मोहन कोपरगे , वय ३२ वर्षे , रा . इंदीरानगर , शेवगाव ता . शेवगाव जि . अहमदनगर याने ५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . पी . आर . देशमुख साहेब , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३७६,३७६ ( अ ) ( ब ) ( २ ) ( आय ) ( जे ) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ४ व ६ नुसार दोषी धरून प्रत्येकी गुन्हयानुसार आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी व रूपये ५,००० / - दंड व दंड न भरल्यास १ वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . सदर खटल्याचा निकाल हा अतिशय कमी कालावधीत म्हणजेच केवळ ९ महिन्यामध्ये लागलेला आहे . घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक ०१.०६.२०२२ रोजी रात्री ८ चे सुमारास मौजे शेवगाव शहरातील इंदिरानगर येथील राहणारा आरोपी नामे रविंद्र मोहन कोपरगे याने ५ वर्षीय वयाची अल्पवयीन पिडीत मुलगी हीस मोबाईल खेळण्याच्या बहाण्याने त्याचे घरी नेवून तिच्यासोबत अनैसर्गिक शारिरीक अत्याचार केला . सदर घटनेची फिर्याद पिडीत मुलीचे आईने शेवगाव पोलिसांसमोर दिली . त्यानुसार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल होवून सदरचा तपास ए.पी.आय. आशिष शेळके यांनी पूर्ण करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीतेची आई , पंच साक्षीदार तपासी अधिकारी , वयासंदर्भात नगर परिषद पाथर्डीचे रजिस्टार क्लर्क श्री . अंबादास साठे व वैद्यकिय अधिकारी डॉ . गहिनीनाथ खेडकर , सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या . सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की , सदर घटनेमधील मुलगी ही पाच वर्षे वयाची लहान चिमुरडी आहे . आरोपीने तिला विश्वासात घेवून त्याच्या घरी नेऊन तिच्याशी वाईट कृत्य केले आहे . घटनेनंतर पिडीत मुलीच्या बालमनावर अतिशय वाईट परिणाम झालेला आहे . घटनेस नऊ महिन्याचा कालावधी होवून गेलेला असला तरीही आजही पिडीत मुलीच्या मनावर अतिशय तिव्र स्वरूपात परिणाम झालेला असून ती आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे . सदरची केस पाहता , नुकतीच उमलत असलेल्या कळीवर आरोपीने असे हीन कृत्य करून तिचे संपूर्ण आयुष्य खुडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे . त्यामुळे या
केसमध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा दिली तर समाजातील विकृतींवर आळा बसेल व अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडून येणार नाहीत . सदरच्या केसमध्ये सरकारी वकीलांनी पिडीत मुलीशी बोलवून तिच्या मनातील भिती घालवण्याचा पुरेपुर प्रयत्न केलेला आहे . परंतु घटनेमुळे तिच्या मनावरील ओरखडे कधीच बरे होणार नाहीत . सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व केस मध्ये झालेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी राणी बोर्डे तसेच पो.कॉ. विजय गावडे , पो.कॉ. खंडागळे यांनी सहकार्य केले .
( ॲड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
विशेष सरकारी वकील ,
अहमदनगर .
मो . ९ ८५०८६०४११,
८२०८ ९९ ६७ ९ ५
अहमदनगर ता . २३/०३/२०२३.