धक्कादायक! अज्ञाताने फवारणीच्या टाकित मिसळले तणनाशक, डाळिंब पिकाचे नुकसान
धक्कादायक! अज्ञाताने फवारणीच्या टाकित मिसळले तणनाशक, डाळिंब पिकाचे नुकसान
चांद्यातील घटनेने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका
नेवासा तालुक्यातील चांदा येथील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांने फवारणीसाठी टाकित साठवून ठेवलेल्या पाण्यात कोणी अज्ञाताने तणनाशकासारखे औषध टाकल्याने संबधीत शेतकऱ्याच्या डाळिब बागेतील जवळपास तीनशे झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे .
चांदा येथील शिवाजी दामोधर दहातोंडे यांच्या गट नं १८४ मध्ये ५० आर (सव्वा एकर) डाळिंब लागवड त्यांनी केलेली आहे. सध्या त्यांची डाळिंब सेंटिंगपुर्ण होत आली होती. चार पाच दिवसा पूर्वी त्यांनी या डाळिंबाला फवारणी करण्याच्या हेतूने सकाळीच पाण्याची टाकी भरून ठेवली होती. त्याच दिवशी सायंकाळी त्यांनी फवारणी केली.
टाकीतील पाण्याबरोबरच त्यासाठी त्यांनी दुसरीकडून पाणी आणून फवारणी केली. मात्र चार पाच दिवसांनी डाळिंब पिकाची पाहणी करण्यासाठी दहातोंडे गेले असता डाळिब बागेतील जवळपास तीनशे झाडांची पानगळ झाली होती. तर झाडांच्या आसपासचे गवतही पिवळे पडले असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. तर उरलेले डाळिंब झाडे व्यवस्थित असल्याचे त्यांना दिसले. यावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाण्याच्या टाकितच तणनाशक टाकले असल्याचा त्यांचा संशय आहे .
सदर घटना दहातोंडे यांनी माजी सभापती कारभारी जावळे यांना सांगितली. त्यांनी नेवासा कृषी विभागाला सदर माहिती दिली. त्यानुसार कृषी विभागाचे कृषी सहाय्यक पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून वरीष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार कृषीतज्ञांकडून संबधीत पिकाची पाहणी केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र झालेल्या या अजब प्रकाराने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संबधीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.