महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा .

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा .

*राहुरी कृषी विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा*

 

 *राहुरी विद्यापीठ, दि. 26 नोव्हेंबर, 2023*

 

 

             महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौव्हान, प्रमुख पाहुणे जेष्ठ कवी व साहित्यिक डॉ. बापूराव देसाई, बार्टी या संस्थेचे श्री. पिरजादे ,उपकुलसचिव प्रशासन श्री. आर. डी. पाटील, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, जीव रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बी. एम. भालेराव उपस्थित होते.

             या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत भारतीय राज्यघटनेच्या संविधान प्रतीची मिरवणूक काढण्यात आली. या संविधान रॅलीमध्ये पदव्युतर महाविद्यालय,डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व 200 पेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी,कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने डाॅ.महावीरसिंग चौहान यांनी लिहिलेल्या घोषवाक्यातून संविधानाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला. यानंतर मुख्य प्रशासकीय इमारती समोर झालेल्या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले.

              यावेळी डॉ. सी. एस. पाटील यांनी उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेची सामूहिक वाचन करून शपथ देण्यात आली. यावेळी डाॅ.सी.एस पाटील हे मार्गदर्शन करताना म्हणाले की संविधानाने देशातील स्त्री पुरुषांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय देण्याचे काम केले. नागरिकांच्या विचारांना तसेच अभिव्यक्तीला स्वातंत्र्य देण्याबरोबर समानतेची संधी देण्याचे मोठे काम केले आहे. यामुळे अर्थातच संविधानाने नागरिकांच्या अधिकारांना बळकटी मिळाली असल्याचे ते म्हणाले.

               डॉ.महावीरसिंग चौव्हान संविधानाबद्दलची पार्श्वभूमी विषद करतांना म्हणाले की भारताचे संविधान देशाची एकता आणि एकात्मता अखंड राखण्याबरोबरच नागरिकांचे हित जोपासण्याचे महत्त्वाचे काम करते.साहित्यिक डॉ. बापूराव देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की आपल्या सर्व धार्मिक ग्रंथानंतर आज सर्वात पूजनीय असा अधार्मिक ग्रंथ कोणता ग्रंथ असेल तर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान होय. या संविधानाने नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे मोठे काम केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले. आभार डॉ. बी. एम. भालेराव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील प्राध्यापक,अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.