राहता बस स्टॅन्ड मध्ये कंडक्टर , ड्रायव्हरला पोलीस कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण
*बस स्थानकात एसटी बस घेऊन येणाऱ्या बस चालक व कंडक्टर यांना लाथा व बुक्यांनी मारहाण*
राहुरी ता प्रती देवेंद्र शिंदे
राहाता येथील बस स्थानकात एसटी बस घेऊन येणाऱ्या बस चालक व कंडक्टर यांना लाथा व बुक्यांनी मारहाण करून, शिवीगाळ व दमबाजी करणाऱ्या येवला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल व त्याच्याबरोबर असलेल्या तीन व्यक्तींविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेचे रक्षक समजले जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अशी वर्तणूक केल्यामुळे पोलीस खात्याचे नाव बदनाम होत असल्याची चर्चा पोलीस व नागरिकांमध्ये दिसून आली. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात बस कंडक्टर बालाजी पंडितराव बोरगावकर व चालक विकास पालाजी मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी, १ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजेदरम्यान राहाता बस स्थानकात एसटी बस क्रमांक MH24AU 1970 घेऊन येणारे चालक विकास मुंडे व कंडक्टर बालाजी बोरगावकर यांना सध्या येवला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात, सार्थक संजय बनसोडे व त्याच्याबरोबर असलेल्या दोन व्यक्तींनी एसटी बस चालक व कंडक्टर यांना शिवीगाळ, दमबाजी करून, लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच एसटी बस चालकांच्या सरकारी गणवेशाचा खिसा फाडला, असून सदर मारहाणीत एसटी बस चालकांना मार लागलेला आहे. तसेच, पोलिसांना देखील दमबाजी करत, "मी पोलीस आहे, तुमच्यावर तसेच पोलीस उपनिरीक्षक लेंडे व पोलीस ठाणे अंमलदार बोर्डे यांना तुम्हाला सर्वांना कामाला लावून टाकेल व तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल," अशी धमकी दिली. फिर्यादी हे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात, पोलीस हेड कॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात व त्याच्याबरोबर असलेल्या तीन व्यक्तींविरोधात, कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत हे करीत आहेत.










