स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांची धडाकेबाज कामगिरी,सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश दोन परराज्यातील आरोपी अटक. -

स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांची धडाकेबाज कामगिरी,सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश दोन परराज्यातील आरोपी अटक.  -

सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश दोन परराज्यातील आरोपी अटक.

-

 दिनांक 18/01/23 रोजी श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील खंडाळा शिवारात, यशवंत बाबा चौका जवळ कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अनोळखी पुरुषाच्या डोक्यात काहीतरी वस्तुने मारहाण करुन, चेहरा विद्रुप करुन खुन केला व रोडचे बाजुला असलेल्या खड्डयात टाकुन पुरावा नष्ट केला.

    सदर घटने बाबत पोलीस नाईक मच्छिंद्र किसन शेलार,. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या तक्रारी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 57/2023 भादविक 302, 201 प्रमाणे अनोळखी इसमा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना या खुनाचे समांतर तपास करुन, सदरचा उघड गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.  

 नमुद गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाव्दारे सखोल तपास करताना तपासात संशयीत मयत इसम हा मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे दिसुन येत असल्याने खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व चालक पोलीस कॉन्स्टेबल संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने तसेच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी त्यांचेकडील पोलीस नाईक बिराप्पा करमल यांना मदतीस घेवुन मध्यप्रदेश येथे पुढील तपास साठी रवाना केले.

 सदर पथक मध्यप्रदेश राज्यात गेल्या असता संशयीत मयत इसमाचा मोबाईल क्रमांकाच्या पत्त्यावर जावुन खात्री करताना पथकास अशी माहिती प्राप्त झाली की, सदर मोबाईल क्रमांक हा सोनु समरालाल चौधरी हा वापरत होता. परंतु सोनु चौधरी हा हरवले असले बाबत अमरपाटण पोलीस स्टेशन मध्यप्रदेश येथे तक्रार नोंद केली असल्याचे सोनु चौधरींच्या नातेवाईकांकडुन माहिती मिळाली. सोनु चौधरी याच्या नातेवाईकांनी वर नमुद गुन्ह्यातील मयताचे फोटो दाखविले असता त्यांनी मयत इसम हा सोनु समरालाल चौधरी, वय 25, रा. खरवाही, ता. अमरपाटण, जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश हा असल्याचे व त्याच्या अंगातील कपडे व पायातील कडे पाहुण ओळखले. सोनु चौधरी याच्या बाबत नातेवाईकांकडे अधिक माहिती घेता मयत इसम हा त्याचा मित्र भुपेंद्र शिवप्रसाद रबि वय 23, रा. सुनौरा, ता. अमरपाटण, जिल्हा सतना, राज्य मध्यप्रदेश सध्या रा. संजय नगर, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर याचेकडे जातो असे सांगुन गेला असल्याची माहिती पथकास मिळाली. सदर भुपेंद्र रबि याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचा शोध घेताना तो श्रीरामपूर येथे असल्याचे तांत्रिक विश्लेषणावरुन दिसुन आल्याने पथकाने मयत सोनु चौधरी याच्या हरवले बाबतचे अमरपाटण पोलीस स्टेशन येथुन सविस्तर माहिती प्राप्त केली.

त्यानंतर पथकाने 

 1) भुपेंद्र शिवप्रसाद रबि वय 23, रा. सुनौरा, ता. अमरपाटण, जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश सध्या राहणार संजय नगर, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर याचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याचा साथीदार 

2) सुरज रामनाथ रावत रा. सुनौरा, ता. अमरपाटण, जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश सध्या रा. संजय नगर, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर याच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानंतर सुरज रावत यास ताब्यात घेवुन दोघांकडे मयत सोनु चौधरी यास का मारले याबाबत विचारपुस करता आरोपी भुपेंद्र याने सांगितले की, त्याचे गांवातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. सदर महिला ही तिच्या पतीसोबत वाद झाल्याने तिच्या राहत्या घरुन पळुन भुपेंद्र याच्याकडे मध्यप्रदेश येथुन श्रीरामपुर येथे आलेली होती. भुपेंद्र याने तिला लोणी येथे एक खोली घेवुन राहण्यासाठी दिलेली होती व तो देखील तिच्यासोबत राहत होता. त्यावेळेसे त्याला समजले की, सदर महिलेचे मयत इसम सोनु चौधरी याचेसोबत देखील प्रेमसंबध आहेत. त्या बाबत त्याने सदर महिलेस विचारणा करता तिने ती मयत सोनु चौधरी याचे सोबत लग्न करणार असल्याचे सांगितले व तो माझा फक्त मित्र बनुन रहात असल्याचे म्हणाली. सदर गोष्टीचा भुपेंद्र याला राग आल्याने व त्याच्या प्रेमात मयत सोनु चौधरी अडथळा बनल्याने त्याने सोनु याला तुझे सदर महिलेशी लग्न लावुन देतो, तु श्रीरामपुर या ठिकाणी ये असे म्हणुन त्यास बोलावुन घेतले. सोनु हा रेल्वेने मनमाड येथे आल्यावर भुपेंद्र व त्याचा साथीदार सुरज रावत अशांनी मनमाड येथे जावुन सदर महिला ही श्रीरामपुर येथे असल्याचे मयत सोनु यास सांगुन त्याला मोटार सायकलवर बसवुन श्रीरामपूर येथे एमआयडीसी परिसरात आणुन दारु पाजली व सोनु चौधरी हा दारुच्या नशेत असताना त्याचे डोक्यावर व तोंडावर लाकडी दांडक्याने मारुन त्यास जिवे ठार मारले तसेच त्याची ओळख पटु नये म्हणुन त्याचा चेहरा विद्रुप केला असल्याची हकिगत सांगितली.

 ताब्यातील दोन्ही इसमांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

 सदर कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर ,व उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग,संदीप मिटके अतिरिक्त प्रभारी श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

       राज्य व परराज्यातील घटनेचा गंभीर्याने तपास लावून स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी मोठी धडाकेबाज कामगिरी केली आहे.