पढेगाव-मालुंजा येथे दुचाकीला अपघात एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी..!!
श्रीरामपूर -
श्रीरामपूर तालुक्या नजीक असणाऱ्या पढेगाव या ठिकाणी चारचाकी गाडीने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकी वरील एक तरूण ठार झाला तर मागे बसलेला दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची समजलेली माहिती अशी की , श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव-मालुंजा रस्त्यावरील विठ्ठलवाडी या ठिकाणी बोरकर वस्तीजवळच्या वळणावर सायं. 5.30 वा. हा भीषण अपघात झाला.पढेगाव ते मालुंजा रस्त्यावर उदय ज्ञानेश्वर पवार (वय 23, रा. माहेगाव, ता. राहुरी) व विजय रामदास गलांडे (वय 22, रा. माहेगाव, ता. राहुरी) हे आपल्यां स्वतःच्या दुचाकी क्रमांक 17 BW- 0798 वरून जात असताना पढेगाव या शिवारातील विठ्ठलवाडी येथील बोरकर वस्ती जवळील वळणावर महिन्द्रा व्हेरीटो या चारचाकी गाडीवरील (क्र. एमएच 20 सीएस 2697) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात गाडी चालवून समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील उदय ज्ञानेश्वर पवार हा जागीच ठार झाला तर विजय रामदास गलांडे हा गंभीर जखमी झाला. या अपघाताबाबत किरण शिवाजी टेकाळे (रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी) यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून चारचाकी वाहन चालक दिलीप दत्तात्रय काळे (रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर) याच्याविरूद्ध भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब), 177 प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हबीब हे पुढील तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी -धिरजकुमार कांबळे)