महात्मा फुले कृषी विद्यापीठात महात्मा जोतीबा फुलेंच्या तैलचित्राचे अनावरण .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठात महात्मा जोतीबा फुलेंच्या तैलचित्राचे अनावरण*
*महात्मा जोतीबा फुले यांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी*
*-कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील*
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना स्त्रियांसाठी शिक्षणाचे दारे उघडण्याचे कार्य करणे म्हणजे महात्मा जोतीबा फुले यांच्या धीरोदात्तपणाची साक्ष देणारी आहे. स्वतःच्या पत्नीस प्रथम साक्षर करून पहिली शिक्षिका तयार करण्याचे महान कार्य त्यांनी केले. मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी सुरु केली. त्यामुळे आज सर्व क्षेत्रात महिला आपली कर्तबगारी दाखवीत आहेत. महात्मा फुलेंनी संपूर्ण समाजासाठी केलेले कार्य आजच्या काळातही सर्वांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यापीठाच्या विशेष अतिथी गृहात महात्मा जोतीबा फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, उपकुलसचिव श्री. व्ही. टी.पाटील व सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे मार्गदर्शन करताना म्हणाले की महात्मा फुले यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला पोवाडा लिहिला. पुण्यामध्ये भिडे वाड्यात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. अशा प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सर्वांना दिशादर्शक ठरेल असे काम केले. डॉ. विठ्ठल शिर्के आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की महात्मा जोतीबा फुले यांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेऊन आपण करीत असलेले काम प्रामाणिकपणे, स्वयंशिस्तीने करून आपण काम करीत असलेली संस्था मोठी कशी होईल हे पहावे. डॉ. साताप्पा खरबडे यावेळी म्हणाले की महात्मा फुले यांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असे आहे. आपण सर्वजण महात्मा जोतीबा फुले यांच्या कार्याची दखल घेऊन आपले जीवन यशस्वी करू.
यावेळी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या शुभहस्ते महात्मा जोतीबा फुले यांचे तैलचित्र बनविणारे प्रसारण केंद्रातील कलाकार तथा छायाचित्रकार श्री. प्रदीप कोळपकर यांचे शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठातील बांधकाम शाखेतून निवृत्त झालेले इंजि. श्री. आनंत मधुकर वायचळ यांचाही कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. वायचळ यांनी विद्यापीठाला महात्मा जोतीबा फुले यांचे पोट्रेट भेट दिले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील महात्मा जोतीबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष अतिथी गृहातील श्री. गणेश मेहत्रे व त्यांचे सहकारी यांचे विशेष योगदान लाभले.या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.