जामखेड येथील लहान मुलीचा खून करून १० वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आले यश .
जामखेड येथील लहान मुलीचा खून करून दहा वर्षापासून फरार असलेला आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे .सदर गुन्हेगारावर रामदास फाळके वय ६० वर्ष,राहणार शिरूर तालुका जामखेड यांच्या सुनेच्या छेडछाड प्रकरणी लक्ष्मण फाळके व गौतम फाळके यांचे विरुद्ध जामखेड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरील केस ही माननीय न्यायालयात चालू होती .या कारणावरून फिर्यादी रामदास फाळके यांचे कुटुंबीय व छेडछाड प्रकरणातील आरोपी लक्ष्मण फाळके व गौतम फाळके यांच्यामध्ये किरकोळ स्वरूपाचे वाद वारंवार चालू असत .आरोपी चे कुटुंब व नातेवाईक गुन्हा दाखल झाल्यापासून रामदास फाळके यांच्या कुटुंबियांना जाणीवपूर्वक त्रास देत होते . दि. ११ /०७/२०१२ रोजी मागील भांडणाच्या कारणावरून लक्ष्मण फाळके, गौतम फाळके, नारायण फाळके,शिवदास फाळके, भरत फाळके,लखाबाई फाळके, शिवगंगा फाळके, शालन फाळके, मैना फाळके, शशी कला फाळके, दादा मुटके व जमुना मुटके सर्व राहणार बसरेवाडी , तालुका जामखेड यांनी संगनमताने रामदास फाळके यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन फिर्यादीची पत्नी जलदाबाई या लघुशंकेसाठी उठले असता त्यांना वरील सर्वांनी मिळून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली .हा सर्व प्रकार चालू असताना जलदाबाई यांची नात संगीता ही आजीला मारू नये म्हणून मध्ये पळत आली .परंतु या नराधमांनी तिलाही मारहाण करून धारदार शस्त्राने गळ्यावर सपासप वार केले व तिचा खून केला .सदर घटनेवरून जामखेड पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. १०० / २०१२भादवि कलम ३०२,१४७,१४८,१४९,३२३,या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .परंतु वरील आरोपींपैकी दादा महादेव मुटके हा फरार झाला होता .
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री . मनोज पाटील यांनी या आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत आदेश पोलीस निरीक्षक श्री अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना दिले होते .या आदेशाचे पालन करत आरोपीचा शोध घेण्यासाठी पो.स .ई.सोपान गोरे, पो. कॉ. सखाराम मोठे,भाऊसाहेब कुरुंद,विश्वास बेरड, देवेंद्र शेलार,मनोहर गोसावी, पो. ना.शंकर चौधरी,लक्ष्मण खोकले,विजय ठोंबरे, संतोष लोंढे, रवी सोनटक्के, श्री भाग्यश्री भिटे,ज्योती शिंदे, चंद्रकांत कुसळकर यांनी मिळून जामखेड परिसरात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.सदर आरोपी हा बसरवाडी तालुका जामखेड येथे स्वतःची ओळख लपवून गावातील बाबु केकान यांचे घरी बांधकामासाठी आलेला आहे अशी खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक अनील कटके यांना मिळाली .श्री अनिल खटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्या ठिकाणी जाऊन आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व त्याची पूर्ण माहिती विचारली असता त्याने त्याचे नाव दादा महादेव मुटके असल्याचे सांगितले .याची सर्व खात्री करून आरोपीस पुढील कारवाईसाठी जामखेड पोलिस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले आहे .
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री . मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सौरभ कुमार अग्रवाल व विभागीय पोलीस अधिकारी श्री .अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे .यांच्या या धडाकेबाज कार्याचे कौतुक जिल्ह्यामध्ये सर्वत्र होताना दिसत आहे .