कृषी महाविद्यालय , पुणे येथे साहिवाल गाय संवर्धन प्रकल्प मंजूर .

कृषी महाविद्यालय , पुणे येथे साहिवाल गाय संवर्धन प्रकल्प मंजूर .

*कृषि महाविद्यालय, पुणे येथे साहिवाल गाय संवर्धन प्रकल्प मंजूर*

*राहुरी विद्यापीठ, दि. 30 मे, 2024*

           भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असलेल्या उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे येथे साहिवाल गाईंचे संवर्धनाकरीता संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र (डेटा रेकॉर्डिंग युनिट) मंजूर झाले आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गाईंच्या अनुवंशिक क्षमतेचे संवर्धन, प्रसार व अनुवंशिक सुधारणा करणे हा आहे. देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी साहिवाल गायीचे संवर्धन करण्यास या केंद्राचे माध्यमातून प्रोत्साहन मिळेल व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशी गाईंचे दूध उत्पादन वाढीस हातभार लागेल असे ते म्हणाले.

           भारत व पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्हा हे साहिवाल गायींचे उगमस्थान. या गाई लंबी बार, लोला, मॉन्टगोमेरी, मुलतानी आणि तेली अशा नावांनी देखील ओळखल्या जातात. अत्यंत शांत स्वभावाच्या साहिवाल गायी देशातील सर्वोत्कृष्ट दूध देणार्या देशी गाईंच्या जातींमध्ये गणल्या जातात. उष्णता सहन करत जास्त दूध उत्पादन देण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्या आशिया खंडातीलच नव्हे तर जगभरात 27 देशांमध्ये निर्यात केल्या गेल्या असून तेथेही चांगले उत्पादन देत आहेत. साहिवाल गाईंची सरासरी दूध उत्पादन क्षमता 2500 ते 2750 लिटर प्रति वेत इतकी असून दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण 4.5 ते 4.75 टक्के इतके आहे. हवामान बदलामध्ये तग धरण्याची क्षमता कमी, रोगास कमी बळी पडण्याची क्षमता व अधिक दूध उत्पादन या गोष्टीमुळे शेतकर्यांकडून साहिवाल गायींची मागणी वाढत आहे. 

              महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुणे कृषि महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने सन 2015 मध्ये साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्राची स्थापना पुणे जिल्ह्यामध्ये केली होती. त्यावेळी निवडक उच्चशिक्षित शेतकर्यांना व कृषि पदवीधरांना एकत्र करून अठरा गाईंपासून हा प्रकल्प चालू केला होता. सध्या याच क्लबमध्ये सुमारे 5000 पेक्षा जास्त साहिवाल गाईंचे संवर्धन केले जात आहे. शेतकरी सहभागातून देशी पशुधनाच्या संवर्धनासाठी उभी राहिलेली ही देशातील एकमेव चळवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या शेतकर्यांकडे साहिवाल गायी आहेत त्यांच्या गाईंची अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी या प्रकल्पाची खूप मदत होणार आहे. शेतकर्यांच्या सहभागातून संशोधन ही संकल्पना या प्रकल्पामुळे वास्तवात उतरविण्यास या प्रकल्पाचे माध्यमातून यश मिळाले आहे. देशात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गायीचे मोठे हब महाराष्ट्रात भविष्यात तयार होण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार आहे अशी माहिती डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांनी दिली.

            भारतीय कृषि संशोधन संस्था अंतर्गत केंद्रीय गाय संशोधन संस्था, मेरठ या संस्थेची स्थापना सन 1987 मध्ये गाईंच्या देशी जातींवर संशोधन करण्यासाठी करण्यात आली. देशांमध्ये प्रामुख्याने दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल, गीर व कांकरेज गाईंवरती संशोधन येथे चालू आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक कार्यक्रमात जर्म प्लाझ्म व डेटा रेकॉर्डिंग युनिट्स यांची स्थापना विविध कृषि विद्यापीठे व भारतीय कृषि संशोधन संस्था येथे केलेली आहे. गायीच्या साहिवाल जातीचे जर्म प्लाझ्म युनिट कर्नाल (हरियाणा) इथे असून देशामध्ये लुधियाना (पंजाब), पंतनगर (उत्तराखंड) व हिसार (हरियाणा) या तीन ठिकाणी डेटा रेकॉर्डिंग युनिट असून शेतकर्यांकडे व सरकारी फार्मवरती असलेल्या गाईंची नोंदणी केली जावून त्यांची सर्व इत्यंभूत माहिती संकलित करून जातिवंत पैदाशीच्या माध्यमातून अनुवांशिक सुधारणा केली जाते.

             जर्म प्लाझ्म युनिटमध्ये उच्च वंशावळीच्या गाईंपासून जन्मलेल्या नामांकित वळूंची चाचणी करून प्रोजेनी टेस्टिंगच्या कार्यक्रमांमध्ये समावेश केला जातो. महात्मा फुले कृषि विद्यापीठास मंजूर झालेले डेटा रेकॉर्डिंग युनिट देशातील चौथे आहे. सदर प्रकल्प देशातील ठराविक कृषि विद्यापीठांमध्येच राबविला जात असून महाराष्ट्रामध्ये त्याचा मान महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांना मिळालेला आहे. विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने नवीन प्रकल्पात शास्त्रज्ञ म्हणून तर डॉ. विष्णू नरवडे व डॉ. धीरज कंखरे सह शास्त्रज्ञ म्हणून काम पहाणार आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.