जबलपूर येथे सौर ऊर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शेतकरी , विद्यार्थी व प्राध्यापक रवाना .
*जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शेतकरी, विद्यार्थी व प्राध्यापक रवाना*
*राहुरी विद्यापीठ, दि. 18 जून, 2024*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकर्यांसाठी सौर उर्जा सिंचन योजना या विषयावर तीन दिवसांच्या क्षमता विकास प्रशिक्षणासाठी जबलपुर-मध्यप्रदेश येथे बोरलॉग इंन्स्टिट्युट ऑफ साउथ एशिया (बीसा) या संस्थेत 30 प्रशिक्षणार्थींची पहिली तुकडी रवाना झाली आहे. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात बोरलॉग इन्स्टिट्युटचे प्रमुख डॉ. रवी गोपालसिंग व त्यांचे सहकारी डॉ. प्रभात कनुजे आणि डॉ. विवेक सिंग हे प्रशिक्षण देणार आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि कृषि विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ यांच्यासाठी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी जाणार्या या पहिल्या तुकडीच्या बसला संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी निरोप दिला. यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार म्हणाले की या पशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारच्या सिंचन पध्दतींमध्ये केलेला सोलरचा उपयोग या संबंधीचा अभ्यास करता येणार आहे तसेच सौर उर्जेचा सिंचन पध्दतींमध्ये होणार्या वापराविषयी जागृती होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी मृदा व जलसंधारण विभागाचे प्राध्यापक डॉ. मुकुंद शिंदे यांनी पार्श्वभुमी विषद केली.