कृषी पदवीच्या रिक्त जागांकरिता प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत केंद्रनिहाय पद्धतीने राबविण्यात येणार - कुलसचिव श्री .अरुण आनंदकर
*कृषि पदवीच्या रिक्त जागांकरीता प्रवेश प्रक्रिया केंद्रीभुत केंद्रनिहाय पध्दतीने राबविण्यात येणार**- कुलसचिव श्री. अरुण आनंदकर*
*राहुरी विद्यापीठ, दि. 29 ऑगस्ट, 2024*
कृषि पदवीच्या रिक्त जागांकरीता केंद्रभुत केंद्रनिहाय प्रवेश फेरी दि. 2 सप्टेंबर, 2024 ऐवजी दि. 30 ऑगस्ट, 2024 पासून सुरु होणार आहे. राज्य समाहिक प्रवेश परिक्षा कक्ष कृषि पदवीच्या रिक्त जांगांकरीता केंद्रीभुत केंद्रनिहाय प्रवेश फेरी यापूर्वी दि. 2 ते 7 सप्टेंबर, 2024 या कालावधीमध्ये राबविणार होती. तथापि यामध्ये आता बदल करण्यात येत असून आता केंद्रभूत प्रवेश फेरी 30 ऑगस्ट, 2024 ते 5 सप्टेंबर, 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ही प्रवेश प्रक्रिया दोन केंद्रावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिले प्रवेश प्रक्रिया केंद्र राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय असून यामध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगांव या जिल्ह्यातील सर्व घटक/विनाअनुदानीत कृषि महाविद्यालये यांचा समावेश आहे. दुसरे प्रवेश प्रक्रिया केंद्र पुणे येथील कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर असून याअंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील सर्व घटक/विनाअनुदानीत कृषि महाविद्यालये यांचा समावेश आहे.
रिक्त जागांकरीता केंद्रीभुत केंद्रनिहाय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी दि. 30 ऑगस्ट, 2024 रोजी 85 पर्सेंटाईल व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविण्यात आलेले आहे. दुसर्या दिवशी दि. 31 ऑगस्ट, 2024 रोजी 65 पर्सेंटाईल व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यर्थ्यांना बोलविण्यात आलेले आहे. दि. 1 सप्टेंबर, 2024 रोजी 50 पर्सेंटाईल व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यर्थ्यांना बोलविण्यात आलेले आहे. दि. 3 सप्टेंबर, 2024 रोजी 35 पर्सेंटाईल व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यर्थ्यांना बोलविण्यात आलेले आहे. दि. 4 सप्टेंबर, 2024 रोजी गुणवत्ता यादीतील सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश प्रक्रियासाठी बोलविण्यात आलेले आहे आणि दि. 5 सप्टेंबर, 2024 रोजी जागांची रुपांतर फेरी होणार असून यासाठी गुणवत्तायादितील सर्व पात्र विद्यार्थ्यांना बोलविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाणे नेमून दिलेल्या केंद्रीभुत केंद्रनिहाय प्रवेश प्रक्रिया केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी 11 वा. च्या आत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांनी केले आहे.